मुंबई : पश्चिम रेल्वेवर दाखल झालेली नवीन एसी लोकल आजपासून सुरू होणार आहे. या 12 डब्यांच्या नवीन लोकलमुळे एसी लोकलच्या 13 फेऱ्या वाढणार असून त्यांची संख्या कार्यालयीन दिवसांमध्ये 96 वरून 109 इतकी होणार आहे. तर शनिवारी आणि रविवारी 52 वरून 65 होणार आहे. एसीच्या वाढीव फेऱ्यांमुळे पश्चिम रेल्वेवरील एकूण सेवांमध्ये वाढ होणार नाही. त्यांची संख्या 1 हजार 406 इतकीच राहणार आहे. यात एसी लोकलच्या डाऊन मार्गावर 6 आणि अप मार्गावर 7 फेऱ्या चालविण्यात येणार आहेत.
पश्चिम रेल्वेच्या चर्चेगेट स्थानकावरून आज दुपारी 12 वाजून 34 मिनिटांनी नवी एसी लोकल सुटणार आहे. पश्चिम रेल्वेवरील वाढीव फेऱ्यांमुळे अप मार्गावर विरार ते चर्चेगेट, भाईंदर ते चर्चेगेट, विरार ते भाईंदर तर विरार - वांद्रे आणि भाईंदर - अंधेरी अशा फेऱ्या चालविल्या जाणार आहेत. त्याचबरोबर डाऊन मार्गावर चर्चगेट ते विरार आणि चर्चगेट ते भाईंदर, अंधेरी - विरार, वांद्रे - भाईंदर, महालक्ष्मी - बोरीवली आणि बोरीवली - भाईंदरच्या दरम्यान १-१ फेरी चालविण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेवर चालवण्यात येणाऱ्या अतिरिक्त फेऱ्यांमुळे रेल्वे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.