मुंबई: अनंत अंबानीसंदर्भात मोठी बातमी समोर येत आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) च्या बोर्डाने शुक्रवार, 25 एप्रिल रोजी 1 मे 2025 पासून अनंत अंबानी यांची कंपनीचे कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला. ही नियुक्ती पाच वर्षांच्या कालावधीसाठी करण्यात आली आहे. भागधारकांच्या मान्यतेनंतर ती अंतिम केली जाईल. रिलायन्सच्या दीर्घकालीन उत्तराधिकार योजनेअंतर्गत हे पाऊल उचलण्यात आले आहे.
अनंत अंबानी सध्या कंपनीत बिगर कार्यकारी संचालक म्हणून काम करत होते. आता ते रिलायन्सच्या कार्यकारी नेतृत्वाचा भाग असतील. स्वच्छ इंधन, कार्बन कॅप्चर तंत्रज्ञान, पुनर्वापर आणि क्रूड-टू-केमिकल्स यासारख्या नाविन्यपूर्ण प्रकल्पांसह, रिलायन्सचे 2035 पर्यंत निव्वळ शून्य कार्बन कंपनी बनण्याचे उद्दिष्ट आहे.
हेही वाचा - गुजरातच्या वंताराच्या धर्तीवर महाराष्ट्रात सूर्यतारा बांधण्याचा विचार; वनमंत्र्यांचे अनंत अंबानींना पत्र
दरम्यान, अनंत अंबानी मार्च 2020 पासून जिओ प्लॅटफॉर्म लिमिटेडच्या बोर्डवर आहेत. मे 2022 पासून त्यांनी रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेडच्या बोर्डातही योगदान देण्यास सुरुवात केली. याशिवाय, ते जून 2021 पासून रिलायन्स न्यू एनर्जी लिमिटेड आणि रिलायन्स न्यू सोलर एनर्जी लिमिटेडच्या बोर्डवर काम करत आहेत.
हेही वाचा - अनंत अंबानींच्या वंताराला मिळाला प्राणी मित्र पुरस्कार
रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये कार्यकारी संचालकपदाची जबाबदारी मिळालेला अनंत हे अंबानी कुटुंबाच्या मुलांपैकी पहिले सदस्य आहेत. तथापि, त्यांचा भाऊ आकाश अंबानी 2022 पासून जिओ इन्फोकॉमचे अध्यक्ष आहेत आणि त्यांची बहीण ईशा अंबानी पिरामल रिलायन्स रिटेल व्यवसायाचे नेतृत्व करत आहेत.