दिल्ली कॅपिटल्सचा नवा सेनापती! IPL 2025 मध्ये अक्षर पटेलची निवड
दिल्ली कॅपिटल्स संघाने IPL 2025 या हंगामासाठी अष्टपैलू अक्षर पटेल याला कर्णधार म्हणून नियुक्त केलं आहे. ऋषभ पंत दिल्लीचं नेतृत्व करत होता. मात्र लिलावात लखनौ सुपरजायंट्स संघानं पंतला ताफ्यात सामील केल्यानं दिल्लीची धुरा कोणाकडं जाणार याची उत्सुकता सर्वांना लागली होती. अनुभवी फाफ डू प्लेसिस आणि के.एल. राहुल यांसारखे पर्याय असतानाही दिल्लीने संघाने अक्षर पटेलवर विश्वास दाखवला.
दिल्ली कॅपिटल्स संघ 2008 पासून आयपीएलमध्ये आहे. पण या संघाला एकदाही जेतेपद पटकवता आलेले नाही. मागील हंगामातही संघ बाद फेरीसाठी पात्र ठरू शकला नाही. त्यामुळे 2025 हंगामासाठी मोठे बदल करत दिल्लीने संघाची धुरा अक्षरकडे सोपवली आहे. 2019 पासून दिल्लीकडून खेळणारा अक्षर हा संघाचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ राहिला आहे. संघ व्यवस्थापनाने त्याला तब्बल 16.5 कोटींना रिटेन करून त्याच्याकडं भविष्यातील कर्णधार म्हणून पाहत असल्याचं संकेत दिले होते.
हेही वाचा - चॅम्पियन्स ट्रॉफीत महत्वपूर्ण कामगिरी करूनही हार्दिक पांड्याला फटका
फाफ आणि राहुलऐवजी अक्षरवर विश्वास का?
फाफ डू प्लेसिसचा अनुभव मोठा असून तो आंतरराष्ट्रीय लीगमध्येही सातत्यानं खेळतो. पण वयाच्या 40व्या वर्षात प्रवेश करणाऱ्या फाफच्या फिटनेस आणि दुखापतीच्या समस्या पाहता त्याला कर्णधार करण्याचा विचार मागे पडला. के.एल. राहुलने पंजाब आणि लखनौचे नेतृत्व केले असले तरी त्याने दिल्ली व्यवस्थापनाला कर्णधारपदाबाबत इच्छुक नसल्याचे कळवले होते. अशा परिस्थितीत आणि उत्साही खेळाडूला संधी दिली.
अक्षर पटेलने यंदा जानेवारीमध्ये भारतीय टी-20 संघाचा उपकर्णधार म्हणून जबाबदारी सांभाळली होती. तसेच सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत गुजरातचे नेतृत्व केल्याचा अनुभवही त्याला गाठीला आहे. मागील हंगामात एका सामन्यात दिल्लीचे नेतृत्व करताना त्याने स्वतःला सिद्ध केले होते.
हेही वाचा - वर्ल्ड कप 2027 आधी टीम इंडियाचे 9 वनडे दौरे, संपूर्ण वेळापत्रक बघा एका क्लिकवर
दिल्ली सपोर्ट स्टाफमध्ये देखील बदल
दिल्ली कॅपिटल्सने खेळाडूंबरोबरच सपोर्ट स्टाफमध्येही बदल केले आहेत. भारताचा माजी फलंदाज हेमांग बदानी मुख्य प्रशिक्षक म्हणून जबाबदारी सांभाळेल. वेणूगोपाळ राव संघाचा संचालक तर इंग्लंडचा माजी खेळाडू मॅथ्यू मॉट सहाय्यक प्रशिक्षक म्हणून भूमिका बजावणार आहेत. विशेष म्हणजे इंग्लंडचा धडाकेबाज फलंदाज केव्हिन पीटरसन संघाचा मेंटॉर असणार आहे.