Thursday, August 21, 2025 02:30:31 AM

गुंतवणूकदारांवर घसरला संकटांचा डोंगर! भारतीय शेअर मार्केटमध्ये मोठी घसरण

कोरोनानंतर प्रथमच भारतीय शेअर बाजारात भीषण पडझड झाल्याची नोंद झाली आहे. सोमवारी सकाळी बाजार उघडताच सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही निर्देशांकांनी हजारो अंकांची घसरण नोंदवली

गुंतवणूकदारांवर घसरला संकटांचा डोंगर भारतीय शेअर मार्केटमध्ये मोठी घसरण

कोरोनानंतर प्रथमच भारतीय शेअर बाजारात भीषण पडझड झाल्याची नोंद झाली आहे. सोमवारी सकाळी बाजार उघडताच सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही निर्देशांकांनी हजारो अंकांची घसरण नोंदवली. सेन्सेक्स तब्बल 3900 अंकांनी कोसळला तर निफ्टीनेही 1146 अंकांची घसरण केली. टाटा मोटर्स, माझगाव डॉक, रिलायन्स यांसारख्या मोठ्या कंपन्यांचे शेअर्स मोठ्या प्रमाणात खाली आले. या घसरणीमागे प्रमुख कारण ठरले आहे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे नव्याने सादर केलेले टॅरिफ धोरण.

बीएसई सेन्सेक्सने 75,364 च्या मागील बंद स्तरावरून 71449 च्या पातळीवर उघडताच घसरण सुरू केली. निफ्टीने देखील 22,904  वरून थेट 21,758 अंकांवर सुरुवात केली. काही क्षणातच हे निर्देशांक आणखी कोसळले. निफ्टी 21,743 वर आला, तर सेन्सेक्स 71,425  च्या पातळीवर व्यवहार करताना दिसला. शेअर बाजारात अशी सुरुवातीची घसरण यापूर्वी फारच क्वचित पाहायला मिळाली आहे.

साप्ताहिक शेवटच्या दिवशी, म्हणजेच शुक्रवारीही बाजारात नकारात्मक कल दिसून आला होता. सेन्सेक्सने 930 अंकांची घसरण नोंदवली होती, तर निफ्टीनेही सुमारे 345 अंक गमावले होते. यामुळेच सोमवारीच्या व्यवहारासाठी गुंतवणूकदार आधीच सावध होते. मात्र, सोमवारी सकाळी मिळालेल्या जागतिक संकेतांनी हा धक्का अधिक तीव्र झाला.

जगभरातील शेअर बाजारही याचप्रमाणे कोसळताना दिसले. हाँगकाँगचा हँग सेंग निर्देशांक ९% नी घसरला, तर जपानचा निक्केई निर्देशांक 8% नी खाली आला. भारतात टाटा स्टील (10.43%), टाटा मोटर्स (8.29%), इन्फोसिस, टेक महिंद्रा, एलटी, एचसीएल टेक, टीसीएस आणि रिलायन्स यांसारख्या कंपन्यांचे शेअर्स मोठ्या प्रमाणात घसरले. गुंतवणूकदारांमध्ये भीतीचं वातावरण असून पुढील काही दिवस बाजारासाठी निर्णायक ठरणार आहेत.


सम्बन्धित सामग्री