AI Health Risk: कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आता दैनंदिन जीवनातील अनेक गोष्टींसाठी सल्ला देत आहे. मात्र, एआयचा सल्ला डोळेझाक करून पाळल्यास त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात, हे अमेरिकेत घडलेल्या एका घटनेतून स्पष्ट झाले आहे. वॉशिंग्टन विद्यापीठातील डॉक्टरांनी नोंदवलेल्या या प्रकरणात, एका व्यक्तीने एआय चॅटबॉट ChatGPT कडून मिळालेल्या आहार सल्ल्यानुसार टेबल सॉल्टऐवजी (सोडियम क्लोराईड) सोडियम ब्रोमाइड वापरला आणि त्याला दुर्मीळ पण गंभीर आजार झाला.
ही घटना वैद्यकीय जर्नल Annals of Internal Medicine: Clinical Cases मध्ये प्रकाशित करण्यात आली आहे. अहवालानुसार, संबंधित व्यक्तीने ChatGPT ला विचारले होते की त्याच्या आहारातून साधे मीठ कसे काढून टाकावे. एआयने उत्तर देताना सोडियम ब्रोमाइड हा पर्याय सुचवला, मात्र त्याच्या धोक्यांविषयी कोणताही इशारा दिला गेला नाही. परिणामी, त्या व्यक्तीने तीन महिन्यांपर्यंत रोज या रसायनाचा वापर केला.
सोडियम ब्रोमाइड म्हणजे काय?
काही दशकांपूर्वी सोडियम ब्रोमाइड आणि इतर ब्रोमाइड संयुगे चिंता, निद्रानाश आणि काही मानसिक आजारांवर उपचारासाठी औषधांमध्ये वापरली जात होती. मात्र, दीर्घकालीन वापरामुळे गंभीर आरोग्य समस्या होऊ लागल्याने ते टप्प्याटप्प्याने बंद करण्यात आले. आज ब्रोमाइड प्रामुख्याने पशुवैद्यकीय औषधे आणि औद्योगिक उत्पादनांमध्ये आढळते. ब्रोमाइड विषबाधा, ज्याला "ब्रोमिझम" म्हणतात, आता अत्यंत दुर्मिळ आहे.
लक्षणे आणि आजाराची प्रगती
संबंधित व्यक्तीला पूर्वी कोणतीही मानसिक किंवा शारीरिक समस्या नव्हती. मात्र, तीन महिन्यांच्या वापरानंतर त्याला गोंधळ, भ्रम, पॅरानोईया, सतत तहान आणि पाणी पिण्याची अनिच्छा अशा लक्षणांचा त्रास होऊ लागला. त्याने पाणी असुरक्षित असल्याची भीती व्यक्त केली. रुग्णालयात दाखल झाल्यावर न्यूरोलॉजिकल विकार, त्वचेवर मुरुमांसारखे डाग आणि चेरी अँजिओमा (लाल ठिपके) यांची चिन्हे दिसली.
डॉक्टरांनी तपासून ब्रोमाइड विषाक्तता असल्याचे निदान केले. ही स्थिती पूर्वी सामान्य होती, पण आता जवळपास अदृश्य झाली आहे.
उपचार आणि बरे होणे
रुग्णाला तात्काळ द्रवपदार्थ व इलेक्ट्रोलाइट संतुलन पुनर्स्थापित करण्यासाठी उपचार सुरू करण्यात आले. तीन आठवड्यांच्या काळजीपूर्वक उपचारांनंतर त्याची तब्येत सुधारली आणि त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.
धडा काय?
ही घटना एआयवर पूर्णपणे अवलंबून राहण्याच्या धोक्याचे उदाहरण आहे. तज्ज्ञांचा सल्ला घेता येण्याऐवजी इंटरनेट किंवा चॅटबॉटवरून मिळालेली माहिती तपासल्याशिवाय वापरणे जीवघेणे ठरू शकते. विशेषत: आहार, औषधोपचार आणि आरोग्यविषयक निर्णय घेताना प्रशिक्षित वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घेणे अत्यावश्यक आहे.
या घटनेने AI तंत्रज्ञानाच्या मर्यादा आणि जबाबदार वापराचे महत्त्व अधोरेखित केले आहे. एआय उपयुक्त असले तरी, चुकीची किंवा अपूर्ण माहिती गंभीर परिणाम करू शकते.