Inspector zende Trailer: जर तुम्ही ओटीटीवर काहीतरी नवीन पाहण्याच्या शोधात असाल, तर तुमच्यासाठी खास बातमी आहे. मनोज बाजपेयी आणि जिम सर्भ अभिनीत ‘इन्स्पेक्टर झेंडे’ हा चित्रपट 5 सप्टेंबर रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. सोमवारी प्रदर्शित झालेल्या त्याच्या ट्रेलरने प्रेक्षकांची उत्सुकता प्रचंड वाढवली असून सोशल मीडियावर त्याची चर्चा रंगली आहे.
सत्य घटनांवर आधारित कथा
‘इन्स्पेक्टर झेंडे’ हा चित्रपट सत्य घटनांवर आधारित आहे. या कथेत मनोज बाजपेयीने एका कुशाग्र बुद्धीच्या पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. त्याचा सामना ‘काल भोजराज’ (जिम सर्भ) या धूर्त गुन्हेगाराशी होतो, जो कुख्यात सिरीयल किलर चार्ल्स शोभराज पासून प्रेरित आहे. या दोघांमध्ये होणारी खेळी आणि थरारक लढत प्रेक्षकांना खिळवून ठेवेल.
हेही वाचा - CM Yogi Biopic Ajey: योगी आदित्यनाथ यांचे जीवन रुपेरी पडद्यावर झळकणार! 'अजय' चित्रपटाला मुंबई उच्च न्यायालयाकडून हिरवा कंदील
ट्रेलरने वाढवली उत्सुकता
दरम्यान, या चित्रपटाचा ट्रेलर 2 मिनिटे 32 सेकंदांचा आहे. यात झेंडे कसा स्ट्रीट-स्मार्ट पद्धतीने अशक्य वाटणाऱ्या केसेस सोडवतो हे दाखवले आहे. ट्रेलरच्या सुरुवातीला मनोज बाजपेयीचा डायलॉग ऐकायला मिळतो की, 'जर कार्ल साप असेल, तर मी मुंगूस आहे… तोही दोन पायांचा आणि शेपूट नसलेला.' मनोज बाजपेयीचा हा डायलॉग प्रेक्षकांना विशेष भावला आहे.
हेही वाचा - Atharva Sudame Controversy: मनोरंजन कर, अक्कल शिकवू नको; अथर्व सुदामेवर ब्राह्मण महासंघाचा घणाघात
दिग्दर्शन आणि निर्मिती
हा चित्रपट चिन्मय मांडलेकर यांनी लिहिला आणि दिग्दर्शित केला असून जय शेवक रमाणी आणि ओम राऊत हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. कथानक त्या काळावर आधारित आहे, जेव्हा सीसीटीव्ही आणि सायबर फॉरेन्सिक साधनांचा वापर होत नव्हता. त्यावेळी मुंबई पोलिसांमध्ये इन्स्पेक्टर मधुकर झेंडे यांचे धाडस आणि जुगाड प्रसिद्ध होते.
मनोज बाजपेयीची खास भूमिका
‘द फॅमिली मॅन’ मालिकेत श्रीकांत तिवारीची भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात घर करणारे मनोज बाजपेयी यावेळी एका पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत वेगळ्या अंदाजात दिसणार आहेत. स्वतः अभिनेत्याने सांगितले की, 'इन्स्पेक्टर झेंडे मला आवडण्याचे कारण म्हणजे तो कधी प्रसिद्धीच्या मागे धावला नाही, फक्त काम करत राहिला. त्याने दोनदा सर्वात कुख्यात गुन्हेगाराला पकडले.' ‘इन्स्पेक्टर झेंडे’ हा थरार, नाट्य आणि विनोदाचा परिपूर्ण मिलाफ असलेला चित्रपट 5 सप्टेंबर 2025 रोजी नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे.