Ethanol Blend E20 Fuel : देशभरातील पेट्रोल पंपांवर ते E20 (20 टक्के इथेनॉल) पर्यंत वाढवले जात आहे. पण दरम्यान, अचानक लोकांमध्ये इथेनॉल मिश्रण इंधनाबद्दल चिंता वाढली आहे. काही वाहन मालकांनी इथेनॉल मिश्रण इंधनामुळे वाहनाच्या इंजिनला नुकसान होऊ शकते का, अशी चिंता व्यक्त केली आहे. याची उत्तरं लोक सोशल मीडिया किंवा गुगलवरुन शोधण्याचा प्रयत्न करत आहे.
इथेनॉल मिश्रण इंधन तुमच्या कारला नुकसान पोहोचवत आहे का?
भारत सरकार इथेनॉल-मिश्रित पेट्रोलला प्रोत्साहन देऊन त्यांच्या हरित इंधन धोरणाचा वेगाने विस्तार करत आहे. त्याची सुरुवात E10 (10 टक्के इथेनॉल) पासून झाली आणि आता देशभरातील पेट्रोल पंपांवर ते E20 (20 टक्के इथेनॉल) पर्यंत वाढवलेजात आहे. पण लोकांमध्ये इथेनॉल मिश्रण इंधनाबद्दल चिंता वाढली आहे. काही वाहन मालकांनी इथेनॉल मिश्रित इंधनामुळे वाहनाच्या इंजिनला होणाऱ्या नुकसानाबद्दल चिंता व्यक्त केली आहे.
एका बाजूला भारत सरकार इथेनॉल-मिश्रित पेट्रोलच्या वापराला प्रोत्साहन देऊन इंधन आयातीवरील अवलंबित्व कमी करू इच्छित आहे. परंतु कार मालकांना, विशेषतः ज्यांनी काही वर्षांपूर्वी त्यांची वाहने खरेदी केली आहेत, त्यांना हे जाणवत आहे की, हा त्यांच्यासाठी तोट्याचा व्यवहार आहे. अलीकडच्या काळात, अनेक वाहन मालकांनी इथेनॉल-मिश्रित पेट्रोलच्या इंजिनला होणाऱ्या संभाव्य धोक्यांबद्दल चिंता व्यक्त केली आहे, अशी भीती व्यक्त केली आहे की, जुन्या कारमध्ये, इथेनॉल-मिश्रित इंधनाचा वापर केल्यामुळे मायलेजवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. तसेच, इंजिनचे आयुष्यही कमी होऊ शकते आणि मोठ्या प्रमाणात दुरुस्ती खर्च देखील येऊ शकतो, अशी चिंता वाहन मालकांना सतावत आहे. मात्र, नैसर्गिक वायू मंत्रालयाने अशा प्रकारच्या चिंता निराधार असल्याचे म्हटले आहे.
तर, या सगळ्यामध्ये एकच प्रश्न अजूनही विचारला जात आहे की, हे नवीन इंधन वापरल्याने मायलेज कमी होतंय का? यामुळे गाडीचं इंजिन खराब होतंय का?
हेही वाचा - iPhone 17 Series Price: नव्या GST दरानंतर पुढील आठवड्यात लाँच होणाऱ्या आयफोन 17 ची किंमत किती असेल?
E20 पेट्रोल म्हणजे काय?
80% सामान्य पेट्रोल आणि 20% इथेनॉलचं मिश्रण आहे. इथेनॉल प्रामुख्याने ऊस आणि धान्यांपासून तयार केलं जातं. हे इंधन वापरल्याने कार्बन उत्सर्जन कमी होतं, तसेच, परकीय तेलावर अवलंबित्वही घटतं.
E20चा गाडीच्या मायलेजवर परिणाम होतो का?
तज्ज्ञांच्या मते, E20 पेट्रोल वापरल्याने मायलेजमध्ये 2% ते 6% पर्यंत घट होऊ शकते. कारण इथेनॉलची ऊर्जा क्षमता पेट्रोलपेक्षा कमी आहे, त्यामुळे गाडीला तेवढंच अंतर कापण्यासाठी थोडं जास्त इंधन लागतं. नवीन (2022 नंतरच्या) E20-रेडी गाड्यांमध्ये हा फरक तुलनेने कमी असतो.
E20ने इंजिन खराब होतं का?
सध्या तरी E20 मुळे जास्त प्रमाणात इंजिन खराब झाल्याच्या अधिकृत नोंदी झालेल्या नाहीत. मात्र, जुन्या आणि E20 रेडी नसलेल्या गाड्यांमध्ये गॅस्किट झिजणं, रबर आणि प्लास्टिक पार्ट्सवर परिणाम होणं, हार्ड स्टार्ट किंवा सुरुवातीला परफॉर्मन्स कमी होणं अशा काही समस्या दिसू शकतात. त्यामुळे जुन्या वाहनधारकांनी सर्व्हिसिंग करूनच E20 वापरायला सुरुवात करणं योग्य ठरेल.
मंत्रालय काय म्हणत आहे?
पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने म्हटलंय की, पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळल्याने वाहनांना नुकसान होत आहे किंवा ग्राहकांना अनावश्यक त्रास होत आहे, ही धारणा खऱ्या तथ्यांवर आधारित नाही आणि याला तांत्रिक आधाराचा अभाव आहे. जैविक इंधनात इथेनॉल मिसळणे हा एक दूरदर्शी, वैज्ञानिकदृष्ट्या योग्य आणि पर्यावरणीयदृष्ट्या जबाबदार उपाय आहे. याच्यामुळे देशाला मोठे फायदे होतात.
तेव्हा, E20 पेट्रोलमुळे मायलेज थोडं कमी होऊ शकतं, पण नवीन गाड्यांसाठी ते सुरक्षित आहे. जुन्या वाहनधारकांनी मात्र योग्य सल्ला घेऊनच त्याचा वापर करावा.
हेही वाचा - भारतात Samsung Galaxy A चा विक्रमी खप! डिसेंबरपर्यंत 10 कोटी Smartphones विक्रीचा टप्पा गाठण्याचे कंपनीचे लक्ष्य