मुंबई : राज्यात आदिवासी विकास विभागामार्फत 611 पदांची भरती करण्यात येणार आहे. आयबीपीएस या नामांकित कंपनीद्वारे आदिवासी विकास विभागातील ही परीक्षा राबविली जाणार आहे. या भरतीची जाहिरात 12 ऑक्टोबर 2024 रोजी महाराष्ट्र सरकारच्या https://tribal.maharashtra.gov.in या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आली होती. या भरतीची अंतिम तारीख 2 नोव्हेंबर 2024 रोजी होती. परंतु बऱ्याच विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी अर्ज भरला नसल्याने त्यात मुदतवाढ करून 30 नोव्हेंबर 2024 करण्यात आली. सरकारी परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर परीक्षेचा अर्ज भरा.
आदिवासी विकास विभागांतर्गत वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक, संशोधन सहाय्यक, उपलेखापाल/मुख्य लिपिक, आदिवासी विकास निरीक्षक, वरिष्ठ लिपिक/सांख्यिकी सहाय्यक, लघुटंकलेखक, अधीक्षक(पुरुष), अधीक्षक(स्त्री), गृहपाल(पुरुष), गृहपाल (स्त्री), ग्रंथपाल, सहाय्यक ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहाय्यक, कॅमेरामेन कम प्रोजेक्टर ऑपरेटर, कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी, उच्चश्रेणी लघुलेखक, निम्नश्रेणी लघुलेखक या पदांसाठी भरती करण्यात येणार आहे.
वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक पदासाठी कला/विज्ञान/विधी पदवी, किंवा शिक्षण किंवा शारीरिक शिक्षणशास्त्रात पदवी असणे गरजेचे आहे. संशोधन सहाय्यक, उपलेखापाल/मुख्य लिपिक, आदिवासी विकास निरीक्षक, वरिष्ठ लिपिक/सांख्यिकी सहाय्यक, या पदासाठी अर्ज करणाऱ्यांसाठी कोणत्याही शाखेची पदवी असणा अनिवार्य आहे. लघुटंकलेखक या पदासाठी दहावी उत्तीर्ण, लघुलेखन 80 श.प्र.मि (शब्द प्रति मिनिट), इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि व मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि असणे गरजेचे आहे. अधीक्षक(पुरुष), अधीक्षक(स्त्री) आणि गृहपाल(पुरुष), गृहपाल (स्त्री) या पदासाठी समाजकार्य/ समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी प्रशासन शाखेतील पदवी तर ग्रंथपाल व सहाय्यक ग्रंथपाल, या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची दहावी उत्तीर्णसह ग्रंथपाल प्रशिक्षण प्रमाणपत्र आवश्यक आहे. प्रयोगशाळा सहाय्यक या पदासाठी दहावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. कॅमेरामेन कम प्रोजेक्टर ऑपरेटर पदासाठी अर्ज करणाऱ्यांसाठी बारावी उत्तीर्णसह फोटोग्राफी डिप्लोमा किंवा प्रमाणपत्र आणि 3 वर्षाचा अनुभव असणे अनिवार्य आहे. कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी पदासाठी कोणत्याही शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे. उच्चश्रेणी लघुलेखक, निम्नश्रेणी लघुलेखक या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची दहावी उत्तीर्ण, इंग्रजी व मराठी लघुलेखन 120 श.प्र.मि, इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि व मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि, आणि MS-CIT (मान्यता प्राप्त संस्थेतून संगणकाचे प्रमाणपत्र) असणे अनिवार्य आहे.
आदिवासी विकास विभागात काम करण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर अर्ज करावा. या भरतीसाठीचा अर्ज करण्यासाठी अवघे तीन दिवस शिल्लक राहिले आहेत. अर्ज भरल्यानंतर लवकर सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर या भरतीच्या परीक्षेसंदर्भातील माहिती दिली जाईल.