नांदेड : कठीण परिस्थितून शिकत बालाजी वाघमारे या तरुणाने नुकत्याच जाहीर झालेल्या पीएसआय (PSI) परीक्षेत यश मिळवले आहे. पहिल्याच प्रयत्नात त्याला हे यश प्राप्त झालं आहे. त्याच्या या यशाचं सर्वत्र कौतुक होत आहे.
बालाजीच्या घरातील परिस्थिती अत्यंत वाईट आहे. आई-वडील शेतात सालगडीचं काम करून संसाराचा गाडा पुढे चालवतात. अशा परिस्थितीतही त्यांनी आपल्या मुलाला शिक्षण दिले आणि आपल्या कष्टाचे फलित म्हणून तो फौजदार बनला.
बालाजी वाघमारे हा नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील देगाव या लहानशा गावात राहतो. बालाजीच्या आईचे नाव रेणुकाबाई आणि वडिलांचे नाव मल्हारी वाघमारे हे शेतात सालगडीचे काम करतात. शेतामध्ये मेहनत करून त्यांनी बालाजीला शिकवले. त्यांना आणखी दोन मुले आहेत. विशेष म्हणजे त्यांचं संपूर्ण कुटुंब निरक्षर आहे. त्याचं पूर्ण आयुष्य काबाडकष्ट करण्यात गेले. या कठीण परिस्थितीतही बालाजीने एम.कॉमपर्यंत शिक्षण पूर्ण केले. आपल्या आई-वडिलांच्या मेहनतीचे चीज करण्यासाठी त्याने स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. कोणतीही शिकवणी केंद्र न लावता त्याने घरीच राहून अभ्यास केला. २०२१ साली बालाजीने एमपीएससीमार्फत (MPSC) चार वेगवेगळ्या परीक्षा दिल्या. तिन्ही परीक्षेत त्याला कमी गुण मिळाले, पण पीएसआय (PSI) परीक्षेत तो उत्तीर्ण झाला. त्याच्या या यशाचं सर्वत्र कौतुक होत असून त्याचा सत्कार देखील करण्यात येत आहे.