Wednesday, August 20, 2025 12:35:01 PM

मुंबईत फटाके फोडण्यावर बंदी; पाककडून होत असलेल्या हल्ल्यांमुळे प्रशासनाचा मोठा निर्णय

सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर मुंबईत 11 मे ते 9 जूनदरम्यान फटाके फोडण्यावर पूर्ण बंदी लागू

मुंबईत फटाके फोडण्यावर बंदी पाककडून होत असलेल्या हल्ल्यांमुळे प्रशासनाचा मोठा निर्णय

मुंबई: पाकिस्तानकडून वाढत्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर मुंबईत फटाके फोडण्यावर बंदी लागू करण्यात आली आहे. प्रशासनाने आजपासून, म्हणजेच 11 मे 2025 पासून ते 9 जून 2025 पर्यंत शहरात कुठेही फटाके फोडण्यावर बंदी घातली आहे. या काळात कोणत्याही प्रकारचे फटाके फोडल्यास संबंधित व्यक्तींवर कडक कारवाई केली जाणार आहे.

मुंबई पोलीस आणि महापालिकेने घेतलेल्या संयुक्त निर्णयानुसार, ही बंदी सार्वजनिक आणि खासगी कार्यक्रम दोन्हींवर लागू आहे. सुरक्षिततेचा धोका आणि सध्या देशातील तणावपूर्ण वातावरण यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

हेही वाचा: पाकड्यांना पाठीशी घालणाऱ्या चीनवर भारताचा हल्लाबोल

प्रशासनाचे म्हणणे आहे की, सध्या देशाच्या सीमांवर तणावाचं वातावरण आहे. पाकिस्तानी घुसखोरी आणि दहशतवादी कारवायांच्या पार्श्वभूमीवर मुंबईसारख्या शहरांमध्ये सतर्कता बाळगणे आवश्यक आहे. फटाके फोडल्यामुळे होणाऱ्या आवाजाने गोंधळ निर्माण होऊ शकतो आणि त्यामुळे खोटे स्फोट वा आपत्तीची भीती निर्माण होण्याचा धोका आहे.

फटाके फोडल्यास निर्माण होणारे ध्वनी आणि वायू प्रदूषण देखील एक गंभीर समस्या आहे. अनेक नागरिक, विशेषतः लहान मुले, वृद्ध आणि आजारी व्यक्ती यांना याचा मोठा त्रास होतो. त्यामुळे नागरिकांनी जबाबदारीने वागणे गरजेचे आहे.

बंदीच्या काळात फटाके विक्री करणाऱ्यांवरही कारवाई करण्यात येणार आहे. पोलिसांनी या कालावधीत गस्त वाढवली असून, सीसीटीव्हीच्या साहाय्याने नजर ठेवण्यात येणार आहे. नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध भारतीय दंड संहितेअंतर्गत गुन्हे दाखल होतील.

मुंबई महापालिकेने आणि पोलिसांनी नागरिकांना आवाहन केलं आहे की, देशाच्या सुरक्षेसाठी आणि शहरातील शांतता अबाधित राहण्यासाठी या निर्णयाला पाठिंबा द्यावा. प्रत्येक नागरिकाने आपली सामाजिक जबाबदारी ओळखून प्रशासनास सहकार्य करावं, असं आवाहन करण्यात आलं आहे.
 


सम्बन्धित सामग्री