Maharashtra Weather Update April 11: नागपूरसह 'या' जिल्ह्यात अवकाळी पावसाचा इशारा
Maharashtra Weather Update April 11: पुणे : मागील काही दिवसांपासून हवामानात सातत्याने बदल होताना पहायला मिळत आहे. होळीच्या सणानंतर उष्णतेचा जोर वाढण्याची अपेक्षा होती. पण यंदा हवामानाने वेगळाच ट्रॅक पकडल्याचं चित्र आहे. एकीकडं काही जिल्ह्यांमध्ये पारा ४३ अंश सेल्सिअसच्या पुढे जाताना दिसतोय. तर दुसरीकडं अनेक भागांमध्ये विजांसह अवकाळी पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
राज्यात अनेक ठिकाणी झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केलं आहे. बीड, जालना, परभणी, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये गारपिटीमुळं फळबागा व भाजीपाला पिके उद्ध्वस्त झाली आहेत. यामुळं शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आलं आहे.
भारतीय हवामान विभागाने, आज 7 जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. ढगाळ वातावरणामुळे उकाडा वाढल्याचं चित्र आहे. येत्या काही तासांत अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा या भागांमध्ये वारे, मेघगर्जना आणि पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. खासकरून गडचिरोली, नागपूर आणि अमरावतीमध्ये हवामानात लक्षणीय बदल होण्याची शक्यता आहे.
मुंबई-पुण्यात कस राहिल वातावरण?
राजधानी मुंबई आणि पुणे या दोन महत्त्वाच्या शहरांमध्ये हवामान तुलनेने सामान्य आहे. उष्णतेचा काहीसा परिणाम जाणवत आहे. तरीदेखील येथे अवकाळी पावसाची तीव्रता अद्याप दिसून आलेली नाही. पण हवामान खात्याच्या अंदाजानुसार कोणत्याही क्षणी पावसाची शक्यता नाकारता येत नाही.
हेही वाचा - आधी You Tube वर पाहिलं 'वडिलांची मालमत्ता कशी हस्तांतरित होईल'! नंतर दोन्ही भावांनी केली वडिलांची हत्या
विदर्भात सूर्य आग ओकत असल्याचं चित्र आहे. अकोला आणि जळगावमध्ये तापमान ४३.७ अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. नागपूर, अमरावती, वर्धा, गोंदिया, भंडारा आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट आली होती. पण आता पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
हेही वाचा - लातूरमध्ये 17 कोटींचं ड्रग्ज सापडलं; प्रकरणात पोलिसाचा सहभाग उघड
दरम्यान, सतत बदलणाऱ्या हवामानामुळं नागरिक आणि शेतकरी दोघेही संभ्रमावस्थेत आहेत. एकीकडं उष्णतेपासून बचावासाठी उपाययोजना आवश्यक असताना दुसरीकडं पावसामुळं पिकांचे संरक्षण ही एक मोठी डोकेदुखी बनली आहे. सरकारनं पीक विमा, नुकसान भरपाई आणि हवामानविषयक अचूक सूचना देण्यासाठी सजग राहावं, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.