मुंबई : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे मुंबईतील माहीम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. अमित ठाकरेंविरोधात एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे सदा सरवणकर आणि ठाकरे सेनेचे महेश सावंत उभे आहेत. सदा सरवणकर हे माहीमचे आमदार आहेत. यामुळे अमित ठाकरेंपुढे मोठे आव्हान असल्याची चर्चा आहे. या वातावरणात एका मनसे पदाधिकाऱ्याच्या मुलीने अमित ठाकरेंना 'अमित काका आमदार बनायचंच' अशा आशयाचे पत्र दिले आहे.
अमित ठाकरे सध्या मतदारसंघात घरोघरी जाऊन प्रचार करत आहेत. हा प्रचार सुरू असताना अमित ठाकरे मनसेच्या एका पदाधिकाऱ्याच्या घरी पोहोचले. याप्रसंगी पदाधिकाऱ्याच्या मुलीने अमित ठाकरेंच्या हाती एक पत्र दिले. या पत्रात 'अमित काका आमदार बनायचंच' असं लिहिलंय. 'हा माझा हट्ट आहे आणि तो तुम्ही पूर्ण करायचाय' असंही पुढे लिहिलंय.