Needle Free Injection Technology: विज्ञान आणि वैद्यकीय क्षेत्रात तंत्रज्ञानाच्या सहाय्याने नव्या दिशा खुल्या होत आहेत. सध्या चर्चेत असलेलं आणि मोठ्या प्रमाणावर वापर सुरू होणारे ‘नीडल फ्री इंजेक्शन’ हे त्याचे ठळक उदाहरण ठरत आहे. पारंपरिक सुईच्या वापराऐवजी उच्च दाबाच्या मदतीने औषध शरीरात पोहोचवणाऱ्या या पद्धतीमुळे इंजेक्शन घेण्याची भीती आणि वेदना दोन्ही टाळता येणार आहेत. विशेषतः लहान मुलांमध्ये इंजेक्शनची भीती ही एक मोठी अडचण असते. ही भीती दूर करत औषध शरीरात पोहोचवण्याची ही नवी पद्धत अधिक प्रभावी, सुरक्षित आणि वेदनारहित असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे ‘नीडल फ्री इंजेक्शन’ हे तंत्रज्ञान भविष्यात वैद्यकीय उपचारांमध्ये क्रांती घडवून आणणारे ठरणार आहे.
कशी काम करते ही प्रणाली?ही प्रणाली पूर्णपणे सुईविरहित आहे. पारंपरिक सुईऐवजी, उच्च दाबाच्या सहाय्याने औषध त्वचेतून आत पाठवले जाते. या प्रक्रियेला ‘जेट इंजेक्शन’ तंत्रज्ञान म्हटले जाते. औषध त्वचेखाली किंवा थेट स्नायूमध्ये 3 ते 4 सेंटीमीटरपर्यंत पोहोचते. ही पद्धत इंट्रामस्क्युलर (intramuscular) आणि सबक्युटेनस (subcutaneous) इंजेक्शन देण्यासाठी उपयुक्त ठरते. या तंत्रामुळे इंजेक्शन घेताना नुसत्या वेदना नाहीशा होत नाहीत, तर सूज, इन्फेक्शन आणि टिश्यू डॅमेजसुद्धा टाळता येतं. त्यामुळे रुग्णांचा अनुभव अधिक चांगला आणि सकारात्मक होतो.
हेही वाचा: Parenting Tips: श्रद्धा की स्वास्थ्य? काळ्या धाग्यामागचं धोकादायक सत्य उघड; जाणून घ्या
बालरोगतज्ज्ञांचे मत
शासकीय मेडिकल कॉलेजचे अधीक्षक आणि बालरोगतज्ज्ञ डॉ. अविनाश गावंडे सांगतात, 'ही प्रणाली विशेषतः लहान मुलांसाठी फायदेशीर आहे. त्यांच्यात सुईची भीती फार असते. मात्र या तंत्रामुळे ती भीती दूर होते आणि औषध देण्याची प्रक्रिया सोपी होते. इन्सुलिन, लसीकरण, डायलिसिस अशा उपचारांमध्ये या तंत्राचा वापर वाढतो आहे. 'ते पुढे सांगतात की, 'सुरक्षिततेच्या दृष्टीनेही ही प्रणाली उपयोगी ठरते. सुईचा वापर नसल्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांना होणाऱ्या इन्फेक्शनचा धोका कमी होतो.'
कोणत्या इंजेक्शन्ससाठी वापर?
या प्रणालीद्वारे सध्या लिक्विड बेस्ड औषधं आणि सर्व प्रकारच्या लसी देता येतात. सहा महिन्यांहून अधिक वयाच्या मुलांवर या पद्धतीची यशस्वी चाचणी भारतात पार पडली आहे. लहानांपासून प्रौढांपर्यंत या तंत्राचा उपयोग करता येतो. मात्र, ऑइल बेस्ड औषधं या पद्धतीने देता येत नाहीत. तांत्रिक मर्यादांमुळे त्यासाठी अजून परंपरागत सुईचाच वापर करावा लागतो.
देश-विदेशात वापर सुरू
विदेशात ही प्रणाली काही वर्षांपासून वापरात आहे. आता भारतातही मास व्हॅक्सिनेशनसाठी ही पद्धत वापरण्याची शक्यता वाढली आहे. अनेक सरकारी आणि खासगी हॉस्पिटल्समध्ये या पद्धतीचं प्रशिक्षण सुरू झालं आहे.
आरोग्यसेवेत नवे तंत्रज्ञान स्वीकारणं हे काळाची गरज आहे. नीडल फ्री इंजेक्शन ही त्याची उत्तम उदाहरणं आहे. यातून रुग्णांचं मानसिक भय कमी होईल, सुरक्षितता वाढेल आणि आरोग्य सेवा अधिक सुलभ व प्रभावी होईल. ही प्रणाली केवळ सुईऐवजी पर्याय देत नाही, तर आरोग्यसेवेच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल आहे.
(Disclaimer: ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी प्रदान केली आहे. जय महाराष्ट्र या माहितीची कोणतीही हमी देत नाही. आरोग्यविषयक कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)