पुणे: पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील लोकांना दररोज मोठ्या वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. खड्डेमय महामार्ग, गर्दीने भरलेले सर्व्हिस लेन आणि पूर्ण न झालेल्या आश्वासनांमुळे जनतेचा रोष वाढत आहे. त्यामुळे आता पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने (पीसीएमसी) अखेर रस्ते दुरुस्तीत निष्काळजीपणा केल्याबद्दल 26 कनिष्ठ अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
26 कनिष्ठ अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस
निगडी ते पिंपरी हा मुंबई-पुणे महामार्ग खड्ड्यांनी भरलेला असून उपनगरे आणि इतर प्रमुख रस्ते देखील खड्ड्यांमुळे बाधित झाले आहेत. जूनमध्ये 'खड्डे व्यवस्थापन' अॅप सुरू करूनही, खराब रस्त्यांच्या स्थितीवर नियंत्रण ठेवण्यात पीसीएमसी अपयशी ठरली आहे. तक्रारींकडे दुर्लक्ष केल्याबद्दल आणि दुरुस्तीचा दर्जा राखण्यात अपयशी ठरल्याबद्दल सर्व आठही झोनमधील 26 कनिष्ठ अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्या आहेत, असे पीसीएमसीच्या स्थापत्य विभागाचे कार्यकारी अभियंता देवान्ना गुट्टुवार यांनी सांगितलं आहे.
हेही वाचा - पुणे-मुंबई प्रवासाचा वेळ अर्धा तासाने कमी होणार; मिसिंग लिंक प्रकल्पाची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून पाहणी
अभियंत्यांना लेखी उत्तर देण्यासाठी किंवा शिस्तभंगाच्या कारवाईला सामोरे जाण्यासाठी तीन दिवसांची मुदत देण्यात आली आहे. दरम्यान, शहरात मेट्रो बांधकामामुळे, विशेषतः भक्ती-शक्ती चौक आणि चिंचवड दरम्यान, परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. खोल खड्डे आणि अरुंद लेनमुळे मार्ग धोकादायक बनला आहे. प्रतिसादात, पीसीएमसीने महामेट्रोला पत्र लिहून तात्काळ दुरुस्ती आणि ट्रॅफिक वॉर्डन तैनात करण्याची विनंती केली आहे. पुणे मेट्रोचे वरिष्ठ अधिकारी हेमंत सोनवणे यांनी सांगितले की, रस्ते पीसीएमसीच्या अखत्यारीत आहेत. पावसाळ्यामुळे दुरुस्तीचे काम थांबवण्यात आले होते. मार्ग अत्यंत वर्दळीचा असल्याने, दुरुस्ती फक्त रात्रीच्या वेळीच करता येते.
हेही वाचा - बनावट मालमत्ता पत्रक तयार करून लाटली सरकारी जमीन; बुलढाण्यातील धक्कादायक प्रकार
तथापी, पीसीएमसीचा दावा आहे की, 1875 खड्ड्यांपैकी 1464 खड्डे ओळखले गेले असून ते कोल्ड मिक्स, जीएसबी, सिमेंट काँक्रीट, खादी आणि पेव्हर ब्लॉक आदी साहित्याने त्यांची दुरुस्ती करण्यात आली आहे. पीसीएमसीचा दावा आहे की आता फक्त 491 खड्डे शिल्लक आहेत, परंतु स्थानिकांचे म्हणणे आहे की ही संख्या खूप जास्त असून यात आणखी भर पडत आहे.