Saturday, September 06, 2025 04:00:56 AM

Pitru Paksha 2025 : एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूची तिथी माहिती नसल्यास पितृ पक्षात कोणत्या दिवशी श्राद्ध करावे, जाणून घेऊ..

पितृपक्षात, पितरांना प्रसन्न करण्यासाठी किंवा शांती मिळवून देण्यासाठी श्राद्ध कर्म, तर्पण आणि दान केले जाते. हे 15 दिवस पितरांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सर्वोत्तम आहेत.

pitru paksha 2025  एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूची तिथी माहिती नसल्यास पितृ पक्षात कोणत्या दिवशी श्राद्ध करावे जाणून घेऊ

Pitru Paksha 2025 : पितृपक्ष लवकरच सुरू होत आहे. पितृपक्ष 2025 चा प्रारंभ रविवार 7 सप्टेंबरपासून होत आहे आणि रविवार, 21 सप्टेंबर रोजी पितृपक्ष संपेल. दरवर्षी, पितृपक्ष भाद्रपद महिन्याचा शुक्ल पक्ष संपल्यानंतर म्हणजे पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवसापासून सुरू होतो आणि आश्विन महिन्याच्या अमावस्येला संपतो. सुमारे 15 दिवसांच्या या कालावधीला श्राद्ध पक्ष किंवा महालया पक्ष असेही म्हणतात. तसेच, 2025 वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण देखील याच दिवशी होणार आहे. वैदिक ग्रंथ आणि शास्त्रांमध्ये पितृपक्षाला विशेष स्थान देण्यात आले आहे. या काळात, पूर्वज पृथ्वीवर येतात आणि नातेवाईकांसह येथे राहतात. पितृपक्षात, प्रत्येक तिथीला कोणाचे तरी श्राद्ध केले जाते, अशा परिस्थितीत, पितृपक्षात बहुतेकदा विचारला जाणारा प्रश्न मृत व्यक्तीची मृत्यू तारीख किंवा तिथी माहीत नसेल तर, त्याचे श्राद्ध कोणत्या तिथीला करता येईल..

हेही वाचा - Anant Chaturdashi 2025 : अनंत सूत्र 14 गाठींचेच का बांधले जाते? जाणून घेऊ महत्त्व आणि पूजेचा शुभ काळ

पितृपक्षातील पंचमी - जर एखाद्या व्यक्तीचा अविवाहित अवस्थेत मृत्यू झाला असेल, तर त्याचे श्राद्ध पितृपक्षाच्या पंचमी तिथीला करावे.
पितृपक्षातील नवमी - या नवमीला अविधवा नवमी असेही म्हटले जाते. या दिवशी पतीच्या आधी मृत्यू पावलेल्या स्त्रीचे म्हणजे म्हणजेच पती जिवंत असताना मृत्यू पावणाऱ्या स्त्रीचे म्हणजेच मृत सुवासिनी किंवा सधवा स्त्रीचे श्राद्ध करावे. या तारखेला, कुटुंबातील सर्व मृत सौभाग्यवती महिलांचे श्राद्ध करता येते. 
पितृपक्षातील एकादशी - या तिथीला संन्यासी झालेल्यांसाठी किंवा मृत संन्यासी व्यक्तीचे श्राद्ध करावे.
पितृपक्षातील त्रयोदशी - पितृपक्षाच्या त्रयोदशी तिथीला मृत मुलांचे श्राद्ध केले जाते. 
पितृपक्षातील चतुर्दशी - या तिथीला शस्त्राने मृत्यू, आत्महत्या, विषबाधा किंवा अपघातात मृत्यू पावलेल्यांचे म्हणजेच अकाली मृत्यु पावलेल्यांसाठी श्राद्ध केले जाते.
सर्वपितृमोक्ष अमावस्या - ही पितृपक्षाची शेवटची तारीख आहे. जर तुम्ही संपूर्ण पितृपक्षात एखाद्याचे श्राद्ध करायला विसरला असाल किंवा मृत व्यक्तीची तारीख माहित नसेल, तर या तिथीला त्यांच्यासाठी श्राद्ध करता येते.

श्राद्ध कर्म करण्याचे फायदे
पितृपक्षात, पितरांना प्रसन्न करण्यासाठी किंवा शांती मिळवून देण्यासाठी श्राद्ध कर्म, तर्पण आणि दान केले जाते. हे 15 दिवस पितरांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि त्यांच्या आत्म्याला शांती देण्यासाठी सर्वोत्तम आहेत. गरुड पुराण आणि धर्मसिंधूनुसार, या काळात पितरांचे आत्मे पृथ्वीवरील त्यांच्या वंशजांकडे येतात आणि श्राद्ध, तर्पण, पिंडदानाने तृप्त झाल्यानंतर त्यांना आशीर्वाद देतात. ज्यामुळे कुटुंबात सुख, शांती आणि समृद्धी येते आणि सर्व प्रकारच्या दोषांपासून मुक्तता मिळते. पितरांच्या कृपेने जीवनात मुलांचे सुख, जीवन, आरोग्य आणि समृद्धी टिकून राहते.

हेही वाचा - Chandra Grahan 2025: 7 सप्टेंबरला 2025 मधलं शेवटचं चंद्रग्रहण; काय काळजी घ्याल?

पूर्वजांचे श्राद्ध न केल्याबद्दलचे दोष
धार्मिक मान्यतेनुसार, जर पूर्वजांचे श्राद्ध केले नाही तर व्यक्तीला पितृदोषाचा सामना करावा लागतो, ज्यामुळे वंशात अडथळे येतात, संततीशी संबंधित दुःख भोगावे लागते, आर्थिक अडचणी येतात आणि मानसिक अशांतता येते. मनुस्मृती आणि गरुड पुराणात स्पष्टपणे सांगितले आहे की श्राद्ध न करणारा व्यक्ती पूर्वज आणि देव दोघांपासूनही विमुख होतो म्हणजेच, दुरावतो. पितृपक्षात श्राद्ध आणि तर्पण करणे आवश्यक आहे. कारण हाच एक पूर्वजांचे ऋण फेडण्याचा मार्ग आहे. याद्वारे मानव देवऋण, ऋषिऋण, पितृऋण आदी फेडू शकतो.

(Disclaimer : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. जय महाराष्ट्र त्याची हमी देत नाही.)


सम्बन्धित सामग्री