ENG vs SA : इंग्लंडचा लाजीरवाणा पराभव, आफ्रिका थाटात सेमीफायनलमध्ये, अफगाण बाहेर
ICC Champions Trophy २०२५ स्पर्धेच्या ११ व्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडचा धुव्वा उडवला. आफ्रिकेने हा सामना ७ गडी राखून जिंकत थाटात सेमीफायनलमध्ये एन्ट्री केली. या निकालासह ब गटाच्या सेमीफायनलचे गणित स्पष्ट झाले. इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील महत्त्वाच्या सामन्यात इंग्लंडच्या संघाने अत्यंत निराशाजनक खेळ केल्यामुळे आफ्रिकेचा संघाने सहज विजय मिळवला. या निकालामुळे अफगाणिस्तानचे सेमीफायनलचे स्वप्न मात्र भंगले.
इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. कर्णधार बटलरचा हा निर्णय अंगाशी आला. दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी भेदक मारा करत इंग्लिश फलंदाजांना जेरीस आणलं. इंग्लंडचा संपूर्ण संघ अवघ्या ३८.२ षटकांत १७९ धावांवर गुंडाळला गेला. जो रूट ने सर्वाधिक ३७ धावांचे योगदान दिले. त्याला सोडल्यास इतर कोणत्याही फलंदाजाला सन्मानजनक धावा करत्या आल्या नाहीत. फिल सॉल्ट (८), बेन डकेट (२४), जॅमी स्मिथ (०), ब्रुक (१९) आणि कर्णधार जोस बटलर (२१) या फलंदाजांनी विकेट्स गमावल्या. शेवटी आर्चर आणि ब्रॉडने थोडेफार प्रतिकार केला पण तो तोकडाच ठरला. दक्षिण आफ्रिकेकडून मार्को यान्सन आणि वियान मुल्डर यांनी प्रत्येकी २-२ गडी बाद केले. तर केशव महाराजने २ आणि एनगिडी-रबाडाने प्रत्येकी १-१ बळी घेतला.
हेही वाचा - Champions Trophy 2025: सेमीफायनलपूर्वी ऑस्ट्रेलियाला धक्का, धाकड फलंदाज दुखापतीमुळे बाहेर जाण्याची शक्यता!
क्लासेनचा क्लास, डुसेनची जबरदस्त खेळी
इंग्लंडने दिलेले आव्हान दक्षिण आफ्रिकेने २९.१ षटकात ३ गड्याच्या मोबदल्यात सहज पूर्ण केले. आफ्रिकेची सुरूवात खराब झाली. संघाची धावसंख्या ११ असताना स्टंब्स शून्यावर बाद झाला. तर ४७ धावासंख्येवर रियान परतला. यानंतर वेन डर डुसेन आणि हेनरिक क्लासेन यांनी संघाचा डाव सावरला दोघांनी शतकी भागिदारी केली. क्लासेन ६४ धावांवर बाद झाला. तर वेन डर डुसेन याने नाबाद ७२ धावांची खेळी साकारत संघाला विजयी केले.
हेही वाचा - रोहित शर्माने मुंबईतील अपार्टमेंट भाड्याने दिले; दरमहा मिळणार 'इतके' भाडे
अफगाणिस्तानचे समीकरण इंग्लंडने बिघडवले
आफ्रिका आणि इंग्लंड संघातील सामन्याचा सर्वात मोठा फटका अफगाणिस्तान संघाला बसला. अफगाणिस्तानला सेमीफायनलमध्ये पोहोचायचे असेल तर इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेचा २०७ धावांनी मोठा पराभव करणे गरजेचे होते. मात्र इंग्लंड स्वतःच २०० धावांचा आकडाही पार करू शकला नाही. त्यामुळे अफगाणिस्तानचे आव्हान संपुष्टात आले आणि आफ्रिकेने आपले स्थान निश्चित केले. हा सामना इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरसाठी खास होता. कारण वनडे संघाचे नेतृत्व करत त्याने अखेरचा सामना खेळला. मात्र इंग्लंडच्या खराब प्रदर्शनामुळे त्याला विजयी निरोप मिळू शकला नाही. संपूर्ण स्पर्धेत इंग्लंडची कामगिरी निराशाजनक ठरली.