मुंबई : आयआरएस अधिकारी समीर वानखेडे निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. समीर वानखेडे शिवसेनेच्या तिकिटावर धारावी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. निवडणूक लढवण्यासाठी ते लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. धारावी हा आरक्षित मतदारसंघ आहे. या मतदारसंघातून समीर वानखेडेंसाठी शिवसेनेची चाचपणी सुरू असल्याचे वृत्त आहे.
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन याला अटक करणे, अभिनेत्री रिया चक्रवर्तीची चौकशी करणे, अमली पदार्थ प्रकरणी धडक कारवाया करणे अशा वेगवेगळ्या कारवायांमुळे समीर वानखेडे चर्चेत राहिले आहेत. समीर वानखेडे नक्की कोणत्या समाजाचे सदस्य आहेत ? असा प्रश्न उपस्थित करत नवाब मलिक यांनी त्यांच्यावर गंभीर आरोप केले होते. हे आरोप समीर वानखेडेंनी फेटाळले. या प्रकरणात नवाब मलिकांनी न्यायालयात केलेल्या एका याचिकेवरील सुनावणी अद्याप प्रलंबित आहे. या प्रकरणात न्यायालयाने समीर वानखेडेंना जामीन दिला आहे तसेच त्यांना सरकारी काम करण्यास परवानगी दिली आहे.
कोण आहेत समीर वानखेडे ?
- भारतीय रेव्हन्यू सर्व्हिसमधील अधिकारी
- आयआरएस असताना नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोमध्ये प्रतिनियुक्ती
- शाहरुखचा मुलगा आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात वानखेडे चर्चेत
- वानखेडेंनी शाहरुखकडे लाच मागितल्याचा आरोप
- लाच प्रकरणात वानखेडेंवर गुन्हा दाखल
- कॉर्डिलीया क्रूझ पार्टीप्रकरणी वानखेडे यांची खात्याअंतर्गत चौकशी
- नवाब मालिकांकडून वानखेडे यांच्या जातप्रमाणपत्राविषयी प्रश्न उपस्थित
- समीर वानखेडे अभिनेत्री क्रांती रेडकरचे पती