Wednesday, August 20, 2025 05:41:16 AM

आता भारतात या राज्यांत AI ट्रॅफिक सिग्नल बसवले जाणार; जाणून घ्या, कसे काम करतील..

अलीकडेच अमेरिकेतील उत्तर कॅरोलिनामध्ये एआय ट्रॅफिक सिग्नल बसवण्यात आले होते, ज्याची जगभरात चर्चा झाली होती. आता भारतातही असेच ट्रॅफिक सिग्नल बसवले जाणार आहेत.

आता भारतात या राज्यांत ai ट्रॅफिक सिग्नल बसवले जाणार जाणून घ्या कसे काम करतील

AI Traffic Signal in India : अमेरिकेतील उत्तर कॅरोलिनामध्ये बसवण्यात आलेल्या एआय ट्रॅफिक सिग्नलने संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले. आता भारतातही एआय ट्रॅफिक सिग्नल बसवले जाणार आहेत. गोव्याव्यतिरिक्त, हे तामिळनाडूच्या चेन्नई शहरात बसवले जातील. असा दावा केला जात आहे की, यामुळे गर्दीमुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीचा वेळ कमी होईल.

लवकरच गोवा आणि तामिळनाडूमध्ये एआय ट्रॅफिक सिग्नल बसवले जातील. टीओआयच्या अहवालानुसार, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मंगळवारी सांगितले की, राज्यातील 91 भागात एआय आधारित ट्रॅफिक सिग्नल बसवले जातील. त्याचप्रमाणे, तामिळनाडूच्या चेन्नई शहरातील 165 प्रमुख चौकांवर AI-चालित स्मार्ट सिग्नल (AI Smart Signals) बसवले जातील. हे सिग्नल आता बसवण्यात आलेल्या ट्रॅफिक लाईटपेक्षा कसे वेगळे आहेत, चला जाणून घेऊया.

हे सध्याच्या ट्रॅफिक सिग्नलपेक्षा वेगळे कसे आहेत?
एआय-चालित सिग्नल वाहतूक परिस्थितीनुसार काम करतात. उदाहरणार्थ, जर वाहतूक कमी असेल तर ते लवकर हिरवा दिवा दाखवतील. तर जर वाहतूक जास्त असेल तर, काही वेळ लागू शकतो. सध्या, ट्रॅफिक सिग्नलमध्ये हिरवा दिवा येण्यासाठी 60 ते 90 सेकंद लागतात. तर हे सिग्नलचे टायमिंग वाहनांच्या संख्येनुसार बदलेल. त्याचा वेळ 30 सेकंद ते 120 सेकंदांपर्यंत असू शकतो.

हेही वाचा - पुढची किमान 15 वर्ष AI म्हणजे नरक असल्यासारखं वाटेल; गुगलचे माजी अधिकारी असं का म्हणाले?

चाचणी यशस्वी झाली
चेन्नई शहरातील पहिल्या टप्प्यात, हे ट्रॅफिक सिग्नल अण्णा सलाई, जवाहरलाल नेहरू सलाई, सरदार पटेल रोड, कामराजर सलाई, राजाजी सलाई आणि टेलर्स रोड सारख्या मुख्य रस्त्यांवर बसवले जातील. सध्या, ईव्हीआर सलाईवरील 6 चौकांवर या प्रणालीची चाचणी सुरू आहे. त्याचे सुरुवातीचे निकाल सकारात्मक आले आहेत. याच्यामुळे पूर्वीच्या तुलनेत वाहतूक कोंडी देखील कमी झाली आहे आणि पुढील काळात याचा अधिक फायदा होईल, असे लोकांचे म्हणणे आहे. हे ट्रॅफिक सिग्नल बसवल्यानंतर लोक त्यांच्या ऑफिस किंवा घरी लवकर पोहोचू शकतील, अशी शक्यता आहे. अमेरिकेत बसवलेल्या एआय सिग्नलमुळेही तेथे वाहतूक कोंडी होण्याचे प्रमाण कमी झाले आहे. लोक वेळेवर त्यांच्या गंतव्यस्थानावर पोहोचू शकले आहेत.

AI ट्रॅफिक सिग्नल सिस्टीमचे 3 भाग
चेन्नईमध्ये बसवण्यात येणारे नवीन ट्रॅफिक सिग्नल 3 भागांवर काम करतील. पहिले, रस्त्यावर बसवलेले सेन्सर, जे वाहनांचा वेग आणि चौक ओलांडण्यासाठी लागणारा वेळ मोजतील. दुसरे, AI ने सुसज्ज कॅमेरे वाहनांची गणना करतील म्हणजेच, संख्या मोजतील. वाहने कोणत्या दिशेने जात आहेत ते पाहतील. ते वाहन कार आहे की बाईक हे देखील ओळखतील. तिसरा भाग म्हणजे एक नियंत्रण युनिट, जे या सर्व माहितीवर प्रक्रिया करेल आणि सिग्नलची वेळ बदलेल. जरी ही प्रणाली स्वयंचलित असली तरी, रुग्णवाहिका किंवा VIP वाहनांचा ताफा सोडणे यासारख्या आपत्कालीन परिस्थितीत, पोलीस ते मॅन्युअली बदलू शकतात.

ग्रीन कॉरिडॉर तयार करण्याचे उद्दिष्ट
चेन्नईमधील प्रत्येक चौकातून मिळणारी माहिती चेन्नई वाहतूक पोलिसांच्या मुख्यालयात पाठवली जाईल. तेथून, संपूर्ण शहरातील रस्त्यांचे सिग्नल समन्वयित केले जातील. याद्वारे 'ग्रीन कॉरिडॉर' तयार केला जाईल असा दावा केला जात आहे. म्हणजेच, शहरातील मुख्य रस्त्यांवर सतत हिरवा दिवा असेल. जेणेकरून वाहने न थांबता पुढे जाऊ शकतील. ही प्रणाली रिअल टाइम व्हिडिओ आणि जुन्या ट्रॅफिक डेटाचा वापर करून ट्रॅफिक जामचा अंदाज लावेल आणि सिग्नलची वेळ आधीच ठरवेल.

हेही वाचा - AI डॉक्टरांची जागा घेऊ शकते, पण नर्सेसची नाही; DeepMindचे सीईओ असे का म्हणाले?


सम्बन्धित सामग्री