मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यापासून राज्यभरात मोठी रणधुमाळी पाहायला मिळाली. आता मतदानाचा दिवस येऊन ठेपला आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात झाली आहे. राज्यातील संपूर्ण प्रशासन यंत्रणा निवडणूक प्रक्रियेसाठी सज्ज झाली आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ जागांसाठी मतदान होणार आहे. तसेच नांदेड लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठीही मतदान होणार आहे. राज्यभरात सकाळी ७ वाजल्यापासून ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदानाचा कालावधी असणार आहे. मतदारांनी या कालावधीत जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन निवडणूक आयोगाकडून करण्यात आले. मतदान केंद्रात मोबाईल नेण्यावर बंदी घालण्यात आली आहे. तसेच नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई करण्याचा इशाराही निवडणूक आयोगाने दिला आहे.
आज मतदार उमेदवारांचे भवितव्य पेटीत बंद करणार आहेत. महाराष्ट्रात २८८ जागांसाठी मतदान होत आहे. महाराष्ट्र राज्यात होणाऱ्या निवडणुकीसाठी ४ हजार १३६ उमेदवार रिंगणात आहेत. त्यामध्ये महिला उमेदवारांची संख्या २५० हून अधिक आहे. महायुती आणि महाविकास आघाडीचे प्रत्येकी ३० महिला उमेदवार रिंगणात आहेत.