मुंबई : भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 68 वी पुण्यतिथी म्हणून महापरिनिर्वाण दिनाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले जाते. महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी देशभरातून लाखो अनुयायी दादरच्या चैत्यभूमी येथे येतात.दरवर्षीप्रमाणे यंदाही महापरिनिर्वाण दिनानिमित्त लाखो अनुयायी मुंबईतील त्यांचे समाधीस्थळ असलेल्या चैत्यभूमी परिसरात दाखल झाले आहेत. लाखो अनुयायी हे चैत्यभूमी स्तूपात ठेवलेल्या आंबेडकरांच्या अस्थीकलश व प्रतिमेस अभिवादन करण्यास आले आहे.
महापरिनिर्वाण दिन हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा स्मृतिदिन असून तो ६ डिसेंबर रोजी आयोजित केला जातो.आंबेडकरांचे ६ डिसेंबर १९५६ रोजी दिल्ली येथे महापरिनिर्वाण (निधन) झाले होते, याच्या दुसऱ्या दिवशी ७ डिसेंबर रोजी मुंबईतील चैत्यभूमी येथे त्यांच्यावर बौद्ध पद्धतीने अंतिमसंस्कार करण्यात आले. निधनापूर्वी त्यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी लक्षावधी अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला होता, त्यांना बौद्ध लोक 'बोधिसत्त्व' मानतात. आंबेडकर हे बौद्ध गुरू होते, यामुळे त्यांच्या पुण्यतिथीसाठी 'महापरिनिर्वाण' हा बौद्ध संकल्पनेतील शब्द वापरण्यात आला आहे.
काय आहे अनुयायींची व्यवस्था?
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादनासाठी मुंबईत येणाऱ्या अनुयायांकरिता मुंबई महापालिकेने विविध सेवा-सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. दादर चैत्यभूमी, छत्रपती शिवाजी महाराज मैदान (शिवाजी पार्क), डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान ‘राजगृह’ यासह आवश्यक ठिकाणी अनुयायींची व्यवस्था करण्यात आली आहे.
यावेळी महिलांसाठी स्वतंत्र असे पिंक टॉयलेट्स, हिरकणी कक्ष, सर्व अनुयायांना शुद्ध पेयजल पुरविण्यासाठी रिव्हर्स ऑसमॉसिस (आरओ) प्लांट, अतिरिक्त प्रसाधनगृह सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यासोबतच संपूर्ण परिसरात स्वच्छता, आरोग्य आणि सुरक्षेच्या अनुषंगानेही विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. शौचालयांच्या संख्येतही यंदा मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. रांगेतील अनुयायांसाठी, मुख्य रस्त्यांवर, इंदू मील परिसर, छत्रपती शिवाजी महाराज मैदान याठिकाणी अतिरिक्त शौचालयांची व्यवस्था करण्यात आली आहे.