महाराष्ट्र: संतोष देशमुख हत्या प्रकरण चांगलेच तापत असल्याचं पाहायला मिळतंय. त्यातच आता मराठा क्रांती ठोक मोर्चा आक्रमक अधिक आक्रमक झालाय. कोण आहे वाल्मीक कराड सरकार आणि संविधानापेक्षा मोठा आहे का? त्याला दोन दिवसात आत नाही टाकल तर पुन्हा आम्हाला आंदोलन करायला भाग पाडू नका.असा इशारा मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक आबासाहेब पाटील यांनी दिला आहे. महाराष्ट्र आणि बीड जिल्हा शांत ठेवायचा असेल तर संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपीला 2 दिवसांत अटक करा असा इशारा यावेळी देण्यात आला. आबासाहेब पाटील यांनी मयत संतोष देशमुख यांच्या कुटुंबाची भेट घेतली. यावेळी त्यांनी हा इशारा दिला आहे.
दरम्यान एक दिवस आधी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सरपंच संतोष देशमुख यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली होती. यावेळी समाजबांधवांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. सरपंच देशमुख यांची अतिशय क्रूरपणे हत्या करण्यात आली आहे.
त्यांच्या अपहरणाची माहिती मिळूनही पोलिस प्रशासनाने तातडीने सूत्रे हलविली नाहीत. त्यामुळे ही बेफिकीरीही देशमुख यांच्या हत्येला कारणीभूत ठरली. देशमुख यांची हत्या होऊन मोठा कालावधी लोटला असला, तरी या प्रकरणातील सर्व आरोपींपर्यंत पोलिस अजूनही पोचू शकले नाहीत.
तपास गतीने, निर्भीड व नि:पक्षपातीपणे करावा, या घटनेत जे कोणी दोषी असतील व त्यांचा संबंध कोणाशीही असेल, त्याचा विचार न करता त्यांना तत्काळ अटक करावी, आरोपींना कठोरातली कठोर शिक्षा व्हावी, अश्या भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या होत्या.