मुंबई: मुंबईत सार्वजनिक ठिकाणी कबुतरांना खायला घालणाऱ्यांवर आता कायदेशीर कारवाई होऊ लागली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे मुंबई पोलिसांनी पहिल्यांदाच अशा प्रकारचा गुन्हा नोंदवला आहे. माहीम पोलिस ठाण्यात एका अज्ञात व्यक्तीविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. ही व्यक्ती मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करत कबुतरांना अन्न देताना दिसली होती.
प्राप्त माहितीनुसार, ही घटना एल.जे. रोडवरील डोमिनोज पिझ्झा आउटलेट आणि हिंदुजा हॉस्पिटलच्या जवळील कबुतरखान्याजवळ घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक अज्ञात व्यक्ती दुचाकीवरून आला आणि कबुतरांसाठी अन्न पसरवून गेला. यावरून BMC ने न्यायालयीन आदेशाच्या अवमानाबद्दल तक्रार दाखल केली.
या कलमांखाली गुन्हा दाखल -
माहीम पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत कलम 223 (विश्वासघात), 270 (संसर्ग पसरवण्याची शक्यता असलेले घातक कृत्य) आणि 271 (क्वारंटाइन नियमांचे उल्लंघन) अंतर्गत व्यक्तीवर गुन्हा दाखल केला. न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठाने BMC ला स्पष्ट निर्देश दिले आहेत की, सार्वजनिक आरोग्यापेक्षा महत्त्वाचे काहीही नाही. न्यायालयाने सांगितले की, कबुतरांना अन्न घालणे म्हणजे सार्वजनिक आरोग्याला धोका निर्माण करणे आहे. त्यामुळे अशा व्यक्तींविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील.
हेही वाचा - Nagpur Crime : 'लुटेरी दुल्हन'कडून 8 पेक्षा अधिक नवरदेवांची फसवणूक, खोटारड्या नवरीचा पर्दाफाश
BMC ची कारवाई सुरू
या आदेशाच्या पार्श्वभूमीवर, BMC ने दादर पश्चिमच्या कबुतरखान्यातील अनधिकृत बांधकाम हटवले. आता मुंबईतील इतर कबुतरखान्यांमध्येही अशाच प्रकारची मोहीम राबवली जात आहे. BMC च्या या मोहिमेला काही प्राणीप्रेमींनी विरोध केला आहे. पल्लवी पाटील, स्नेहा विसरारिया आणि सविता महाजन यांनी या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. मात्र न्यायालयाने स्पष्ट केलं की, कबुतरांना खायला घालणे सार्वजनिक अशांतता आणि आरोग्य धोक्यात आणणारे कृत्य आहे.
हेही वाचा - यवतप्रकरणी अफवांवर विश्वास ठेवू नका; पत्रकार परिषदेत पोलिसांचं आवाहन
दरम्यान, आता मुंबईत कबुतरांना सार्वजनिक ठिकाणी खायला घालणे आता कायदेशीर दृष्टिकोनातून गंभीर गुन्हा ठरत आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर BMC आणि पोलिसांनी कडक पावले उचलायला सुरुवात केली आहे. नागरिकांनी याबाबत सजग राहण्याची गरज आहे, अन्यथा अशा कृत्यांमुळे नागरिक कायदेशीर अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.