Thursday, August 21, 2025 02:55:37 AM

Night Thirst: रात्री वारंवार तहान लागतेय? हे आरोग्याच्या गंभीर समस्येचं लक्षण असू शकतं; जाणून घ्या

रात्री वारंवार तहान लागणं डिहायड्रेशन, डायबेटीस, किडनी विकार किंवा स्लीप एपनियासारख्या गंभीर आजारांचे संकेत असू शकतात, त्यामुळे वेळेत डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.

night thirst रात्री वारंवार तहान लागतेय हे आरोग्याच्या गंभीर समस्येचं लक्षण असू शकतं जाणून घ्या

Causes Of Excessive Thirst At Night: रात्री झोपेतून उठून पुन्हा पुन्हा पाणी पिण्याची सवय काही लोकांमध्ये पाहायला मिळते. काही जण याकडे सामान्य सवय म्हणून पाहतात, तर काहींना याचा त्रासही जाणवतो. मात्र, वैद्यकीय दृष्टीकोनातून ही सवय सातत्याने जाणवत असेल तर ती आरोग्याच्या समस्येचा संकेत असू शकते.

रात्री वारंवार तहान लागण्याला वैद्यकीय भाषेत ‘नॉक्ट्युरिया’ किंवा ‘पॉलिडिप्सिया’ असं म्हणतात. या अवस्थेत व्यक्तीला वारंवार पाणी प्यावेसे वाटते किंवा सतत मूत्रविसर्जनाची आवश्यकता भासते.

का लागते रात्री वारंवार तहान?

तज्ञांच्या मते, डिहायड्रेशन, मधुमेह किंवा किडनीशी संबंधित काही त्रासांमुळे अशी अवस्था उद्भवू शकते. विशेषतः, शरीरात पाण्याची कमतरता किंवा शरीरात होणारे हार्मोनल बदल यामुळे तहान वाढते. याकडे वेळेवर लक्ष न दिल्यास गंभीर आरोग्य समस्या होण्याचा धोका असतो.

हेही वाचा: Rice Facts: भात खाल्ल्यामुळे डायबिटीज होतो? जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला आणि योग्य आहाराचा मंत्र

कोणकोणत्या आजारांची शक्यता?

1. टाइप 2 डायबेटीस (Diabetes Mellitus): रक्तातील साखरेचं प्रमाण वाढल्यावर शरीर त्या साखरेला बाहेर टाकण्याचा प्रयत्न करते आणि त्यामुळे वारंवार लघवी होते. परिणामी, शरीर डिहायड्रेट होतं आणि तहान लागते.

2. डायबेटीस इन्सिपिडस (Diabetes Insipidus): ही एक दुर्मिळ स्थिती असून किडनी शरीरात पाण्याचं संतुलन राखण्यात अपयशी ठरते. यामध्ये हार्मोनल असंतुलन, विशेषतः अँटी-डाययूरेटिक हार्मोनच्या (ADH) कमतरतेमुळे लघवीस वारंवार जावं लागतं आणि तहान लागते.

3. क्रोनिक किडनी डिजीज: किडनीची कार्यक्षमता कमी झाल्यास शरीरात पाण्याचं आणि इलेक्ट्रोलाइट्सचं संतुलन बिघडतं. त्याचा परिणाम म्हणून रात्री वारंवार तहान लागते आणि लघवी होण्याची आवश्यकता वाढते.

4. स्लीप एपनिया: झोपेत श्वास घेण्यात अडथळा येणं म्हणजे स्लीप एपनिया. यामध्ये श्वसनात व्यत्यय आल्याने तोंड कोरडं पडतं आणि त्यामुळे तहान वाढते.

काय करावे?

जर तुम्हाला सतत रात्री उठून पाणी प्यावं लागत असेल, तर हे दुर्लक्ष करण्याजोगं नाही. डिहायड्रेशनमुळे होणाऱ्या साध्या त्रासापासून ते मधुमेह व किडनीच्या आजारांपर्यंत या समस्येचं स्वरूप असू शकतं. त्यामुळे वेळेत डॉक्टरांचा सल्ला घेणं महत्त्वाचं आहे.

रोजच्या जीवनशैलीत थोडेसे बदल करून या समस्येवर नियंत्रण मिळवता येऊ शकतं. योग्य प्रमाणात पाणी पिणं, झोपेची वेळ निश्चित करणं आणि आरोग्य तपासण्या नियमित करणं हे आरोग्यासाठी उपयुक्त ठरू शकतं.
 


सम्बन्धित सामग्री