Wednesday, August 20, 2025 08:52:33 PM

म्हातारपणात मोठा निधी आणि करसवलत हवीय? निवृत्तीनंतर ELSS आणि SWP मुळे होईल डबल फायदा

ELSS तुम्हाला कर सवलतीसह चांगला परतावा देते, तर SWP तुम्हाला नियमित उत्पन्न देऊन आर्थिक स्वावलंबन सुनिश्चित करते.

म्हातारपणात मोठा निधी आणि करसवलत हवीय निवृत्तीनंतर elss आणि swp मुळे होईल डबल फायदा
Edited Image

नवी दिल्ली: जेव्हा आपण आर्थिक नियोजन करत असतो, तेव्हा ते केवळ गुंतवणुकीपुरते थांबत नाही. कारण, कर बचत हाही एक महत्त्वाचा पैलू असतो. कर बचत केल्याने आपण आपल्या मध्यावधी आणि दीर्घकालीन आर्थिक उद्दिष्टांनाही अधिक चांगल्या पद्धतीने गाठू शकतो. विशेषतः निवृत्तीचा विचार करताना प्रत्येकालाच आर्थिकदृष्ट्या सुरक्षित आणि आनंदी जीवन जगायचे असते. त्यासाठी आजपासूनच योग्य नियोजन करून निधी तयार करणं गरजेचं आहे. यासाठी सिस्टिमॅटिक विथड्रॉवल प्लॅन (SWP) आणि इक्विटी लिंक्ड सेव्हिंग्ज स्कीम (ELSS) हे दोन पर्याय फायदेशीर ठरू शकतात. हे पर्याय तुम्हाला केवळ कर वाचवण्यासाठीच नव्हे, तर भविष्यातील नियमित उत्पन्नासाठीही उपयुक्त ठरू शकतात.

ELSS: कर बचत आणि उत्तम परतावा 

ELSS ही एक इक्विटी-आधारित गुंतवणूक योजना असून, ती आयकर कलम 80C अंतर्गत 1.5 लाखांपर्यंत कर सवलत देते. यात फक्त 3 वर्षांचा लॉक-इन कालावधी आहे, जो सर्व कर बचतीच्या पर्यायांमध्ये सर्वात कमी आहे. महत्त्वाचे म्हणजे, ELSS फंडांनी गेल्या काही वर्षांत गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे. SIP किंवा एकरकमी गुंतवणुकीद्वारे ELSS मध्ये गुंतवणूक केल्यास दीर्घकालीन संपत्ती निर्माण करता येते. यात काही गुंतवणूकदारांचे पैसे 5 वर्षांत 3-4 पट झाले आहेत.

हेही वाचा - दरमहा 500 रुपये गुंतवा अन् निवृत्तीनंतरची चिंता मिटवा! काय आहे सरकारची योजना? जाणून घ्या

SWP: नियमित उत्पन्नाचा शाश्वत स्रोत

तथापी, SWP म्हणजे सिस्टीमॅटिक विथड्रॉवल प्लॅन. हा एक अशा प्रकारचा म्युच्युअल फंड पर्याय, ज्यामध्ये तुम्ही नियोजित रक्कम ठराविक कालावधीसाठी काढू शकता.
उदा. जर तुम्ही 16,00,000 लाख रुपये गुंतवले असतील, तर तुम्ही दरमहा 10,000 इतकी रक्कम SWP मार्फत काढू शकता, आणि तरीसुद्धा तुमचं मूळ भांडवल सुरक्षित राहू शकतं. 

हेही वाचा - यूट्यूब, इंस्टाग्रामवरून पैसे कमावताय? मग ‘या’ पद्धतीने भरा कर; सरकारने बदलले नियम

निवृत्तीपूर्व आर्थिक नियोजन करताना ELSS आणि SWP हे दोघेही 'स्मार्ट कॉम्बिनेशन' ठरू शकतात. ELSS तुम्हाला कर सवलतीसह चांगला परतावा देते, तर SWP तुम्हाला नियमित उत्पन्न देऊन आर्थिक स्वावलंबन सुनिश्चित करते. त्यामुळे, निवृत्तीनंतर आर्थिकदृष्ट्या सुरक्षित राहण्यासाठी तुम्ही हे दोन्ही पर्याय निवडू शकता. 

Disclaimer: शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीची आहे. नियम व अटी काळजीपूर्वक वाचा. जय महाराष्ट्र कोणत्याही नफ्या-तोट्यास जबाबदार नाही. गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या!


सम्बन्धित सामग्री