मुंबई: लग्न म्हणजे केवळ दोन व्यक्तींचा संबंध नव्हे, तर दोन कुटुंबांमधील नातेसंबंध, संस्कृती, विचारसरणी आणि भावनिक समजूतदारपणाचा एक अनोखा संगम असतो. अशा वेळी वय हा एक अत्यंत महत्त्वाचा घटक मानला जातो. विशेषतः भारतासारख्या पारंपरिक समाजात, लग्न ठरताना वधू-वराच्या वयात किती फरक आहे, याला खूप महत्त्व दिलं जातं. प्रेमविवाहामध्ये दोघांमध्ये प्रेम असल्याने वयाकडे फार लक्ष दिलं जात नाही. पण अरेंज मॅरेजमध्ये मुलगा-मुलीच्या वयात योग्य अंतर आहे का, याची अधिक काळजी घेतली जाते. वयोफरकाचे काही फायदे असून ते वैवाहिक जीवनात समतोल, परिपक्वता आणि स्थैर्य निर्माण करतात.
पती-पत्नीमधील वयोफरकाबद्दल चाणक्य नितीमध्ये काय सांगितलयं?
आचार्य चाणक्य हे केवळ एक राजकारणतज्ज्ञ नव्हते, तर घरगुती आणि वैयक्तिक आयुष्याविषयीही त्यांनी स्पष्ट मार्गदर्शन केलं आहे. त्यांच्या 'चाणक्य नीती' या ग्रंथात स्पष्टपणे सांगितलं आहे की, पत्नी ही पतीपेक्षा 3 ते 5 वर्षांनी लहान असावी. या विधानामागील विचार असा आहे की वयातील थोडक्याच फरकामुळे दोघांमध्ये परस्पर समज, भावनिक परिपक्वता, सहनशीलता आणि सुसंवाद अधिक चांगल्या प्रकारे निर्माण होतो. पती जर वयानं थोडा मोठा असेल, तर तो अनुभवाने अधिक परिपक्व असेल, ज्यामुळे तो घरगुती जीवनात संतुलन साधू शकतो.
हेही वाचा - Gajkesari Rajyog : जन्मकुंडलीत असा तयार होतो गजकेसरी राजयोग! जीवनात मिळतो खूप आदर आणि संपन्नता
पती-पत्नीमध्ये जास्त वयोफरक टाळावा -
चाणक्य पुढे स्पष्ट करतात की पती जर खूप मोठा आणि पत्नी खूपच लहान असेल, तर अनेकदा दोघांमधील सुसंवाद हरवतो. वैचारिक अंतर, जीवनशैलीतील फरक, सामाजिक वागणूक या सगळ्यांमध्ये विसंगती निर्माण होण्याची शक्यता असते. परिणामी अशा विवाहांमध्ये आनंद टिकवणं कठीण होतं. तसेच चाणक्य म्हणतात, अती वयोफरकाने वैवाहिक जीवनात असमाधान, कुरबुरी आणि गैरसमज वाढू शकतात.
हेही वाचा - पूर्वजांशी संबंधित 'या' 3 स्वप्नांकडे चुकूनही करू नका दुर्लक्ष; अन्यथा होऊ शकते मोठे नुकसान
आधुनिक काळातही लागू होतो का हा सल्ला?
आजच्या काळात स्त्रिया आणि पुरुष दोघेही शिक्षण, करिअर आणि व्यक्तिमत्त्व विकासाच्या दृष्टीने समांतर वाढत आहेत. त्यामुळे वयातील फार मोठं अंतर अनेकांना त्रासदायक वाटू शकतं. पण तरीही 3 ते 5 वर्षांचा वयोफरक हा तसा संतुलित मानला जातो. चाणक्यांनी दिलेला वयोफरकाचा सल्ला हा फक्त एक सामाजिक सल्ला नाही, तर अनुभव, परिपक्वता आणि सुसंवाद यांचं एक समीकरण आहे. वैवाहिक जीवन दीर्घकाळ टिकवायचं असेल, तर जोडीला समजूत, आदर, प्रेम, संवाद आणि परस्पर विश्वास हेही घटक महत्त्वाचे आहेत.
Disclaimer: येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. जय महाराष्ट्र त्याची हमी देत नाही.