दरवर्षीप्रमाणे, 1 एप्रिल हा दिवस संपूर्ण जगभरात 'एप्रिल फूल डे' म्हणून उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी लोक आपल्या मित्र-मैत्रिणींना, कुटुंबीयांना आणि सहकाऱ्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या खोड्या करून फसवतात. यशस्वी खोडी झाल्यानंतर मोठ्याने 'एप्रिल फूल'! असे ओरडले जाते. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की हा दिवस का आणि कधी सुरू झाला? यामागची कहाणी तुम्हाला आश्चर्यचकित करेल!
एप्रिल फूल डेचा इतिहास
एप्रिल फूल डेचा उगम नक्की कुठून झाला याबद्दल वेगवेगळ्या कथा आहेत. मात्र, सर्वात प्रसिद्ध कथा आहे ती इंग्लंडच्या प्रसिद्ध कवी ज्योफ्री चॉसरच्या 'कँटरबरी टेल्स' या ग्रंथातील. सन 1381 मध्ये इंग्लंडचे राजा रिचर्ड दुसरे आणि बोहेमियाची राणी अॅन यांच्या लग्नाची अधिकृत घोषणा करण्यात आली. मात्र, राजाने लग्नाची तारीख '32 मार्च' अशी जाहीर केली. हे ऐकून लोकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले, तयारी सुरू झाली. पण काही वेळाने लक्षात आले की 32 मार्च ही तारीखच अस्तित्वात नाही! म्हणजेच, संपूर्ण जनता एका मोठ्या खोडीचा शिकार झाली होती. याच घटनेनंतर ब्रिटनमध्ये 1 एप्रिलला लोक एकमेकांना अशाच प्रकारे फसवू लागले आणि पुढे हा दिवस 'ऑल फूल्स डे' किंवा 'एप्रिल फूल डे' म्हणून साजरा केला जाऊ लागला.
हेही वाचा: Shukra Gochar 2025: 1 एप्रिलपासून बदलणारा या राशींचे नशीब, होणार सुख समृद्धीची भरभराट!
जगभरातील एप्रिल फूल डे सेलिब्रेशन
स्कॉटलंड: येथे हा उत्सव दोन दिवस चालतो. खोड्या करणाऱ्या लोकांना 'गॉक्स' म्हणजेच कोकिळा पक्ष्याच्या नावाने संबोधले जाते.
फ्रान्स आणि इटली: येथे हा दिवस 'एप्रिल फिश' म्हणून ओळखला जातो. लोक एकमेकांच्या पाठीवर कागदी मासे चिकटवून फसवतात.
भारत: इथे हा दिवस मुख्यतः मैत्रीपूर्ण आणि मजेशीर खोड्यांसाठी ओळखला जातो. सोशल मीडियावर फेक न्यूज पसरवण्याचे प्रमाणही या दिवशी वाढते.
एप्रिल फूल डेचे महत्त्व
एप्रिल फूल डे केवळ खोड्या करण्याचा दिवस नाही, तर तो हास्य आणि आनंद पसरवण्याचा एक सुंदर मार्ग आहे. हलक्या-फुलक्या मस्कऱ्यांमुळे नात्यांमध्ये गोडवा निर्माण होतो. अर्थात, हा आनंददायी अनुभव होण्यासाठी खोड्या निरुपद्रवी असाव्यात. कोणालाही दुखावणाऱ्या गोष्टी टाळाव्यात.