Bharat Bandh: देशभरात बुधवारी 9 जुलै 2025 रोजी देशभरात 'भारत बंद'ची हाक देण्यात आली आहे. शेतकरी, कामगार आणि केंद्रीय कामगार संघटनांनी या संपाची घोषणा केली आहे. या देशव्यापी संपात 25 कोटींहून अधिक ग्रामीण कामगार आणि शेतकरी सहभाग घेणार असल्याचे सांगितले जात आहे. भारत बंदचा बँका, पोस्ट ऑफिस, वाहतूक आणि कारखान्यांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस (एआयटीयूसी), हिंद मजदूर सभा (एचएमएस) आणि संयुक्त किसान मोर्चा यासारख्या केंद्रीय कामगार संघटनांनी या बंदला पाठिंबा दिला आहे.
या संघटनांचे म्हणणे आहे की, केंद्र सरकारची धोरणे कामगार आणि शेतकऱ्यांच्या बाजूने नाहीत. त्यांचा आरोप आहे की सरकार कॉर्पोरेट कंपन्यांना फायदा पोहोचवण्यासाठी कामगार कायद्यांमध्ये सुधारणा करत आहे. याशिवाय, ते खाजगीकरणाला प्रोत्साहन देत आहे आणि ग्रामीण भागातील वाढत्या समस्यांकडे दुर्लक्ष करत आहे.
हेही वाचा - 9 जुलै रोजी बँकिंग आणि विमा सेवा बंद राहणार? देशभरातील 25 कोटी कर्मचारी संपावर जाणार
25 कोटींहून अधिक कर्मचारी देशव्यापी संपात सहभागी होणार -
दरम्यान, एआयटीयूसीच्या अमृतजित कौर यांनी सांगितले आहे की, या संपात 25 कोटींहून अधिक कामगार सहभागी होतील. 'गावांमधील शेतकरी आणि कामगारही रस्त्यावर उतरून निषेध करतील.' दरम्यान, हिंद मजदूर सभेचे हरभजन सिंग सिद्धू यांनी सांगितले की, या संपाचा बँकिंग, टपाल, कोळसा खाणकाम, कारखाने आणि वाहतुकीवर परिणाम होईल.
हेही वाचा - दिलासादायक! पूल आणि बोगदे असलेल्या राष्ट्रीय महामार्गांवर आता कमी टोल लागणार
उद्या सरकारी बँका बंद राहतील का?
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या सुट्ट्यांच्या यादीनुसार, बुधवार, 9 जुलै रोजी बँकांमध्ये सुट्टी नाही. तथापि, भारत बंदमुळे बँकिंग सेवांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. या देशव्यापी संपाचा परिणाम पश्चिम बंगाल, केरळ, महाराष्ट्र आणि तामिळनाडूसारख्या राज्यांमध्ये सर्वाधिक दिसून येण्याची शक्यता आहे. ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन (AIBEA) ने देखील 'भारत बंद'मध्ये सहभागी होणार असल्याचं म्हटले आहे.