पुणे : पुण्यात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हवामान (Rain Update) विभागाने (weather update) वर्तविला आहे. सध्याही कामावर जाणाऱ्या लोकांची बिकट अवस्था झाली आहे. शहरातील रस्त्यांची खराब अवस्था आणि पाणी तुंबल्यामुळे वाहतूक कोंडीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. अशी अवस्था दरवर्षी होतच असते. या पार्श्वभूमीवर हिंजवडीसह इतर आयटी पार्कच्या परिसरातील कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ची जाहीर करावे, अशी मागणी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आयटी कर्मचाऱ्यांनी केली आहे.
फोरम फोर आयटी एम्प्लॉईज या संघटनेने ही मागणी केली आहे. संघटनेचे अध्यक्ष पवनजीत माने यांनी म्हटले आहे की, बहुतांश आयटी कंपन्या आधीपासूनच संमिश्र पद्धतीने कामकाज करीत आहेत. काही कंपन्यांनी सध्या घरातून काम करण्याची सुविधा दिली आहे. मात्र, ती सर्वच कंपन्यांनी दिलेली नाही. त्यामुळे काही दिवस घरून काम दिल्यास कामकाजावर परिणाम होणार नाही. वर्क फ्रॉम होम ही कार्यपद्धती आतापर्यंत यशस्वी आणि सर्वांसाठी फायद्याची ठरलेली आहे. शिवाय, कर्मचारी खड्डेमय रस्ते तुंबलेले पाणी आणि वाहतूक कोंडी यात अडकून पडणार नाहीत. याच्यामुळे वेळेचा आणि ऊर्जेचा अपव्यय वाचू शकतो. तसेच, याच्यामुळे कंपन्यांच्या खर्चात कपात होत असल्याने आतापर्यंत कंपन्यांचाही फायदा झालेला आहे.
हेही वाचा - Heavy Rain Alert : मुंबईसह उपनगराला पावसानं झोडपलं; राज्यातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी
पुण्यातील सध्याची रस्त्यांची खराब अवस्था पाहता घरून काम करण्याची मुभा देणे आवश्यक बनले आहे. शहर परिसरात अनेक भुयारी मार्गांमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचते. याचबरोबर अनेक रस्त्यावर पाणी तुंबण्याची समस्या निर्माण होते. रस्त्यांवर मोठे खड्डे पडले असून पावसामुळे ते दिसून न आल्याने अपघात होण्याचा मोठा धोका निर्माण होतो. या समस्यांकडे शहराच्या विकासात नेहमीच काणाडोळा करण्यात आला आहे. किंवा उपाययोजना फारशा दर्जेदार नाहीत. या पार्श्वभूमीवर वर्क फ्रॉम होम देण्याची आवश्यकता आहे, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्याकडे फोरमने केली आहे.
‘वर्क फ्रॉम होम’चा निर्णय घेतल्यास हे फायदे होतील
- वाहतुकीवरील ताण कमी होईल
- प्रशासनावरील ताणही कमी होईल.
- कर्मचाऱ्यांची सुरक्षितता जपली जाईल.
- वेळेचा आणि ऊर्जेचा अपव्यय वाचेल.
मे महिन्यातही झाली होती अशी मागणी
मे महिन्यात मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली होती. तेव्हाही या समस्या भेडसावत होत्या. आयटी पार्कमधील वाहतूक समस्या बिकट बनली होती. दररोज संध्याकाळी काही किलोमीटरच्या वाहनांच्या रांगा लागत असल्याचे चित्र होते. त्यामुळे आता या पावसाळ्यात माहिती तंत्रज्ञान कर्मचाऱ्यांसाठी ‘वर्क फ्रॉम होम’ म्हणजेच घरून काम करण्याची सक्ती सरकारने करावी, अशी मागणी करण्यात आली होती. आयटी कर्मचाऱ्यांना येत असलेल्या अडचणींचा सरकारनेच विचार करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
प्रकल्पांचे नुसते नियोजन, प्रत्यक्ष काम केव्हा?
गेल्या काही वर्षांत आयटी पार्कमधील कंपन्यांची आणि पर्यायाने वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. याच वेळी रस्त्यांचे रुंदीकरण आणि पर्यायी मार्ग तयार करण्याकडे दुर्लक्ष झाले. शिवाय, रस्त्यांचा दर्जा इतक्या वाहतुकीच्या तुलनेत अगदी सुमार राहिला. तसेच, पावसाळ्यात रस्ते, भुयारी मार्गांमध्ये पाणी साचणार नाही, यासाठी आवश्यक उपाययोजना शहराच्या प्लॅनिंगमध्ये प्रभावीपणे राबविलेल्या नाहीत. यामुळे ऐन पावसाळ्यात चांगल्या रस्त्यांचे पर्याय अगदी कमी राहतात.
दरम्यान, वाहतूक कोंडीच्या समस्येवर वारंवार तक्रारी येऊ लागल्याने अखेर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) आयटी पार्कमधील उड्डाणपुलासह पर्यायी रस्त्यांच्या 650 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे नियोजन केले. मात्र, गेल्या सहा महिन्यांपासून नियोजनापलीकडे गेलेलेच नाही. या प्रकल्पांवर प्रत्यक्ष काम सुरु कधी होणार असा सवाल केला जात आहे.
हेही वाचा - Mumbai Rain Update: मुंबईत पावसाचा हाहाकार; कोणते रस्ते बंद, कोणते सुरू आणि लोकल सेवेच वेळापत्रक जाणून घ्या