मुंबई: निरोगी राहण्यासाठी जीवनशैली थोडी बदलली पाहिजे. यामुळे आपल्याला त्याचे चांगले परिणाम अनुभवायला मिळतात. आपण नुसते बोलतो की जुने लोक जास्त वर्ष जगायचे पण आपण हे कधी पाहिले नाही की ते लोक एवढे वर्ष तंदुरुस्त कसे जगायचे ? चला तर मग जाणून घेऊयात...
निरोगी आरोग्यासाठी सकाळी लवकर उठावे. दात घासण्याआधी कोमट पाणी प्यावे आणि प्रातिर्विधी करुन घ्यावा. त्यानंतर दात घासावे. नंतर अंघोळ करावी शक्यतो थंड पाणी किंवा कोमट पाणी वापरावे. सकाळी भरून जेवण करावे. जमिनीवर मांडी घालून बसावे आणि जेवणे करावे. याने अन्न पचन उत्तम होते. जेवणाच्या अगोदर 45 मिनिट आणि जेवणानंतर 1 तासाने पाणी प्यावे. जेवताना एक ते दोन घोट पाणी प्यायला हरकत नाही. नेहमी पाणी पिताना हळूवार व खाली बसूनच घोट घोट पाणी प्यावे. उभे राहून गडबडीने पाणी पिऊ नये. शरीराला दररोज लाळेची गरज असते जेवताना थोडी लाळ पोटात जाते आणि बाकीची लाळ आपल्याला पाण्यातूनच शरीरात घालवावी लागते. त्यासाठी पाणी घोट घोट करूनच प्या. तसे केल्यास बरेच आजार दूर राहतात.
हेही वाचा: Nag Panchami 2025: नागपंचमीची पूजा कशी करतात, चुकूनही 'या' गोष्टी करु नये
नेहमी जेवण केल्यावर 10 ते 15 मिनिटे वज्रासनात बसावे. दुपारी जेवण केले की वामकुक्षी (20 मिनिटे झोपावे) घ्यावी आणि संध्याकाळी जेवण केल्यावर 3 तास झोपू नये व शतपावली करावी. झोपताना नेहमी आकाशाकडे डोळे असावे असेच झोपावे आणि जमिनीशी जेवढा संपर्क तेवढे चांगले, पोटावर झोपू नये. मैदा, डालडा, वनस्पती तेल, पामतेल, बेकरीचे पदार्थ अजिबातच खावू नयेत. पचन लवकर होण्यासाठी जेवणानंतर थोडासा गुळ खावा. कमीत कमी 6 ते 7 तास झोप आरोग्यासाठी पुरेशी आहे. दररोज एक तास प्राणायाम, 15 मिनिट योगासने व जेवढे जमेल तेवढे सूर्यनमस्कार करणे. प्राणायाम मात्र नियमित करणेच चांगले. रोज न चुकता एक आवळा किंवा आवळ्याचा रस प्यावा. तसेच दुधी भोपळा, गाजर, बिट, मुळा, काकडी, कोबी यांचा वापर करावा.
जास्त वेळ पाय सोडून बसणे टाळावे, जास्त वेळ उभे राहणे, जास्त वेळ ड्रायव्हिंग करणे टाळावे. त्यापेक्षा जास्त वेळ मांडी घालून बसावे, ज्यामुळे आपले मणके व सांधे चांगले राहतील. भारतीय रस म्हणजे उसाचा रस, कोकम सरबत, आवळा रस, लिंबू सरबत, फळांचा ज्यूस हेच आपल्या शरीराला उत्तम पोषक आहेत. या गोष्टी दररोज पाळल्याने निरोगी राहण्यास मदत होते.