Independence Day 2025: स्वातंत्र्यदिन जवळ येताचं संपूर्ण देशात उत्साहाचे वातावरण निर्माण होते. 15 ऑगस्ट हा दिवस प्रत्येक भारतीयासाठी केवळ सण नाही, तर स्वातंत्र्याच्या संघर्षात बलिदान दिलेल्या वीरांना आदरांजली वाहण्याची संधी आहे. 1947 च्या या दिवशी भारताने ब्रिटिश राजवटीतून मुक्त होऊन स्वतंत्र राष्ट्र म्हणून जगात स्थान मिळवले. पण एक प्रश्न आजही अनेकांच्या मनात येतो, तो म्हणजे, स्वातंत्र्यासाठी 15 ऑगस्ट या दिवसाचीच निवड का झाली?
निर्णयामागील ऐतिहासिक पार्श्वभूमी
3 जून 1947 रोजी, ब्रिटनचे शेवटचे व्हाइसरॉय लॉर्ड माउंटबॅटन यांनी घोषणा केली की भारताला 15 ऑगस्टपर्यंत स्वातंत्र्य दिले जाईल. त्या काळात देश फाळणीच्या भीषण परिस्थितीतून जात होता. हिंदू-मुस्लिम दंगली वाढत होत्या आणि सांप्रदायिक हिंसाचार टोकाला पोहोचण्याची शक्यता होती. अशा तणावपूर्ण वातावरणात माउंटबॅटन यांनी स्वातंत्र्याची तारीख शक्य तितकी लवकर आणि संस्मरणीय ठेवण्याचा निर्णय घेतला.
हेही वाचा - Independence Day 2025: स्वातंत्र्य दिनाला लालकिल्ल्यावर पंतप्रधान मोदींचे लाईव्ह भाषण ऐकण्यासाठी ''असे'' बुक करा सीट
भारतीय स्वातंत्र्य विधेयक ब्रिटिश संसदेत मांडण्यात आले आणि ते मंजूर झाल्यानंतर 15 ऑगस्ट हा दिवस अधिकृतपणे भारताच्या स्वातंत्र्य दिनासाठी निश्चित झाला. योगायोगाने, हा दिवस दुसऱ्या महायुद्धाच्या इतिहासातही महत्त्वाचा होता. 15 ऑगस्ट 1945 रोजी जपानने मित्र राष्ट्रांसमोर शरणागती पत्करली होती. लॉर्ड माउंटबॅटन यांच्यासाठी 15 ऑगस्ट ही तारीख वैयक्तिक दृष्ट्याही महत्त्वाची होती. दुसऱ्या महायुद्धात मित्र राष्ट्रांच्या सैन्यात महत्त्वाची भूमिका निभावणारे माउंटबॅटन या दिवशी जपानच्या शरणागतीचे साक्षीदार होते. त्यामुळे त्यांनी हा दिवस भारताच्या स्वातंत्र्याच्या रूपात इतिहासात कोरून ठेवण्याचा निर्णय घेतला.
हेही वाचा - यंदा स्वातंत्र्यदिनी दिल्लीतील 50 स्वच्छता कर्मचारी असणार लाल किल्ल्यावर ''विशेष पाहुणे''
आजही अविरत देशभक्तीचा उत्साह -
स्वातंत्र्यानंतरच्या 78 वर्षांनंतरही 15 ऑगस्ट हा दिवस प्रत्येक भारतीयाच्या हृदयात तोच उत्साह, आनंद आणि अभिमान जागवतो. हा दिवस केवळ तिरंगा फडकवण्याचा नाही, तर बलिदान, त्याग आणि संघर्षाच्या स्मृतींना उजाळा देण्याचा आहे. असंख्य स्वातंत्र्यसैनिकांच्या आहुतीमुळे आपण आज मुक्त आहोत. म्हणूनच प्रत्येक वर्षी हा दिवस नव्या उर्जेने साजरा केला जातो. 15 ऑगस्ट हा केवळ तारखेचा योगायोग नाही, तर तो आपल्या स्वातंत्र्याच्या इतिहासातील एक सुवर्ण इतिहास आहे. हा इतिहास पुढील अनेक पिढ्यांना सदैव प्रेरणा देत राहील.