यवतमाळ जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या नावाने बनावट फेसबुक अकाऊंट तयार करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. सदर प्रकरणाचे कनेक्शन थेट राजस्थानपर्यंत पोहोचल्याचे समोर आले आहे. यवतमाळ सायबर सेलकडे या प्रकरणाची तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर सदर बनावट अकाऊंट तत्काळ बंद करण्यात आले. सायबर सेलच्या तपासात एका भामट्याने हे बनावट अकाऊंट तयार केल्याचे उघड झाले आहे.
या बनावट फेसबुक अकाऊंटवर पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांचा फोटो प्रोफाइल आणि बॅकग्राऊंडवर ठेवण्यात आला होता. विशेष म्हणजे, या अकाऊंटमधून फ्रेंडलिस्टमधील काही मित्रांना संदेश पाठवण्यात आले. यातूनच हा प्रकार उघडकीस आला. फ्रेंडलिस्टमधील एका व्यक्तीने तातडीने सायबर सेलशी संपर्क साधत हा प्रकार कळवला. सायबर सेलच्या अधिकाऱ्यांनी त्वरित दखल घेत, सदर बनावट अकाऊंट बंद केले.
राजस्थानपर्यंत पोहोचलेले या प्रकरणाचे धागेदोरे आता सायबर सेल तपासण्यात व्यस्त आहे. कुमार चिंता यांच्या नावाचा गैरवापर केल्याप्रकरणी आरोपीचा शोध सुरू असून लवकरच आरोपीला अटक केली जाणार असल्याचे संकेत पोलिसांनी दिले आहेत. सायबर गुन्ह्यांच्या वाढत्या घटनांमुळे पोलीस यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे.