E-PAN Scam: सायबर गुन्हेगारांच्या जाळ्याचं स्वरूप दिवसेंदिवस बदलत आहे. आता त्यांनी पॅन कार्डच्या नावाखाली एक नवा स्कॅम सुरू केला आहे. 'Download E-PAN' नावाने येणाऱ्या बनावट ईमेलद्वारे लोकांना गंडवले जात आहे. हा ईमेल पाहून अनेकांना वाटते की सरकारकडून आलेली अधिकृत माहिती आहे, पण सत्य वेगळं आहे. हा ईमेल पूर्णपणे बनावट असून, त्यामधून तुमचं बँक खातं, वैयक्तिक माहिती, आणि डिजिटल सुरक्षा धोक्यात येऊ शकते.
काय आहे हा स्कॅम?
या स्कॅममध्ये नागरिकांना सांगितलं जातं की, 'तुमचं नवीन PAN 2.0 कार्ड तयार आहे. खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून ते डाउनलोड करा.' ईमेलमध्ये सरकारी लोगो, QR कोड, आणि आकर्षक डिझाईन दिलं जातं जे पाहून तो अधिकृत वाटतो. पण खरा हेतू वेगळाच असतो त्या लिंकवर क्लिक करताच तुम्ही स्कॅमर्सच्या बनावट वेबसाइटवर पोहोचता.
त्या बनावट वेबसाइटवर तुमच्याकडून नाव, मोबाईल नंबर, आधार क्रमांक, पॅन नंबर, बँक डिटेल्स, पासवर्ड्स अशी महत्त्वाची माहिती मागवली जाते. एकदा ही माहिती दिल्यावर तुमच्या बँक खात्यातून पैसे चोरले जाऊ शकतात. त्याचा गैरवापर करून तुमच्यावर कर्ज काढले जाऊ शकते किंवा ओळखचोरीही होऊ शकते.
स्कॅम ओळखायचे कसे?
1. gov.in वगळता दुसऱ्या कोणत्याही डोमेनवरून आलेले ईमेल संशयास्पद असतात.
2. ईमेलमध्ये जर लिंक असली आणि ती उघडल्यानंतर वेबसाइट अधिकृत वाटत नसली, तर तिथे माहिती भरू नका.
3. कोणतीही सरकारी संस्था तुमच्याकडून अशा पद्धतीने माहिती मागवत नाही.
अशा स्कॅमपासून स्वत:ला सुरक्षित कसं ठेवायचं?
कोणत्याही अनोळखी ईमेलवरील लिंकवर क्लिक करू नका.
फक्त अधिकृत वेबसाइट्सचा वापर करा उदाहरणार्थ, पॅनसंबंधित माहिती किंवा सेवा हवी असल्यास www.incometax.gov.in या वेबसाइटलाच भेट द्या.
बँक किंवा आर्थिक व्यवहारासंबंधित माहिती कुठेही सहज देऊ नका.
संशयास्पद ईमेल मिळाल्यास त्याचा स्क्रीनशॉट काढा आणि तो फिशिंग/स्पॅम म्हणून रिपोर्ट करा.
चुकून लिंकवर क्लिक केलं तर?
जर तुमच्याकडून चुकीने माहिती भरली गेली असेल तर लगेच:
तुमच्या बँकेला संपर्क करा आणि खातं तात्काळ ब्लॉक किंवा मॉनिटर करायला सांगितं.
सर्व पासवर्ड्स, UPI PIN, नेट बँकिंग लॉगिन बदला.
नजीकच्या पोलीस ठाण्यात किंवा सायबर क्राईम सेलमध्ये तक्रार दाखल करा.
www.cybercrime.gov.in वर ऑनलाइन तक्रार द्या.
ई-पॅनच्या नावाने सुरु झालेला ‘PAN 2.0’ स्कॅम सामान्य नागरिकांना लक्ष्य करत आहे. माहितीअभावी अनेक जण त्यात अडकत आहेत. त्यामुळे तुम्हाला किंवा तुमच्या ओळखीच्या व्यक्तींना असा ईमेल आल्यास जागरूक राहा आणि योग्य ती खबरदारी घ्या. डिजिटल काळात सावधगिरी हीच खरी सुरक्षा आहे.