Thursday, August 21, 2025 07:22:49 AM

Dahi Handi Festival 2025: दहीहंडी सरावादरम्यान 11 वर्षीय गोविंदाचा उंचीवरून पडून मृत्यू

दहीहंडी सरावादरम्यान झालेल्या दुर्दैवी अपघातात एका 11 वर्षीय गोविंदाचा मृत्यू झाला आहे. हा प्रकार केतकीपाडा भागात घडला असून मृताचे नाव महेश रमेश जाधव असे आहे.

dahi handi festival 2025 दहीहंडी सरावादरम्यान 11 वर्षीय गोविंदाचा उंचीवरून पडून मृत्यू
Edited Image

मुंबई: मुंबईतील दहिसर परिसरात दहीहंडी सरावादरम्यान झालेल्या दुर्दैवी अपघातात एका 11 वर्षीय गोविंदाचा मृत्यू झाला आहे. हा प्रकार केतकीपाडा भागात घडला असून मृताचे नाव महेश रमेश जाधव असे आहे. महेश आपल्या टीमसोबत मानवी पिरॅमिड तयार करण्याचा सराव करत होता. यादरम्यान त्याचा तोल गेला आणि तो उंचीवरून थेट खाली पडला. 

घटनेच्या वेळी खाली त्याला पकडण्यासाठी पुरेसे लोक नव्हते, त्यामुळे त्याच्या डोक्याला आणि शरीराला गंभीर दुखापत झाली. जखमी महेशला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेने जाधव कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तसेच परिसरात शोककळा पसरली आहे.

हेही वाचा - Khed Accident: खेडमध्ये भीषण अपघात! भाविकांना घेऊन जाणारा पिकअप दरीत कोसळला; 7 महिलांचा मृत्यू

सुरक्षा उपाययोजनांचा अभाव ठरला घातक - 

तज्ज्ञांच्या मते, अशा अपघातांचे मुख्य कारण म्हणजे सरावावेळी आणि स्पर्धेदरम्यान मूलभूत सुरक्षा साधनांचा अभाव. हेल्मेट, सेफ्टी बेल्ट, क्रॅश मॅट्स यांचा वापर आणि पिरॅमिडभोवती पुरेशी मानव भिंत नसणे या गंभीर त्रुटी ठरतात. तसेच, प्रशिक्षणादरम्यान अनुभवी देखरेखीचा अभावही जोखमीचे प्रमाण वाढवतो. या अपघातानंतर नागरिक, सामाजिक संघटना आणि काही दहीहंडी पथकांनी राज्य सरकारकडे तातडीने सुरक्षा नियम कठोर करण्याची मागणी केली आहे. त्यांनी सूचित केले की, प्रत्येक सराव आणि स्पर्धेदरम्यान सेफ्टी गिअरचा अनिवार्य वापर, प्रशिक्षित देखरेख, वयोमर्यादा नियम आणि आपत्कालीन वैद्यकीय व्यवस्था असणे बंधनकारक करावे.

हेही वाचा -Ratnagiri Crime : 'या' छोट्याशा पुराव्यामुळे सापडला चिपळूणमधील शिक्षिकेचा खुनी ; वाचून तुम्हालाही बसेल धक्का

दरवर्षी दहीहंडी स्पर्धांदरम्यान अनेकजण जखमी होतात किंवा जीव गमावतात. त्यामुळे योग्य उपाययोजना न केल्यास भविष्यातही अशाच दुर्घटना घडत राहतील. मुंबई पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून, आयोजकांनी सुरक्षा उपाय पाळले होते का याची चौकशी केली जात आहे. महेशच्या मृत्यूने केवळ एक कुटुंब उद्ध्वस्त झाले नसून दहीहंडीच्या सुरक्षिततेबाबतचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
 


सम्बन्धित सामग्री