मुंबई: राज्यातील ‘माझी लाडकी बहीण’ योजनेत पात्रता नियमांचे उल्लंघन झाल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारने मोठी कारवाई सुरू केली आहे. या योजनेनुसार, एका घरातील केवळ दोन महिलांनाच लाभ घेता येतो. तसेच पात्र महिलांसाठी वयोमर्यादा 21 ते 65 वर्षे असावी, असा स्पष्ट नियम आहे. मात्र, अलीकडील तपासात अनेक कुटुंबांमध्ये दोनपेक्षा जास्त महिलांना लाभ मिळाल्याचे आणि अनेक लाभार्थी वयोगटाबाहेर असल्याचे आढळून आले आहे.
या पार्श्वभूमीवर महिला व बालविकास विभागाने 26 लाख लाभार्थी महिलांची पडताळणी यादी तयार केली आहे. अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका आणि संबंधित अधिकारी यासाठी घरोघरी भेट देऊन लाभार्थ्यांची कागदपत्रे तपासतील. यात अधिवास प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचे दाखले, जन्मतारीख आणि इतर आवश्यक पुरावे पाहून पात्रतेची खात्री केली जाईल.
हेही वाचा - नागपूर-पुणे वंदे भारत ट्रेनचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन
पडताळणी दरम्यान लाभार्थी करदाता आहे का, वाहन मालक आहे का किंवा चारचाकी वाहनाच्या मालकीचा पुरावा आहे का, हेही तपासले जाणार आहे. एका घरात जर तीन महिला नोंदणीकृत असतील, तर नियमांनुसार दोनच पात्र ठरवून उर्वरित एक अपात्र मानली जाईल. यासाठी पडताळणी पथकांना घरातील वाहनांचे नोंदणी क्रमांक नोंदवण्याचेही आदेश देण्यात आले आहेत. या व्यापक तपासाचा उद्देश निधीचा गैरवापर रोखणे आणि योजना केवळ पात्र महिलांपर्यंत पोहोचवणे हा आहे. सरकारच्या मते, जर पात्रतेच्या अटींची काटेकोर अंमलबजावणी केली नाही, तर योजनांचा उद्देश हरवून निधी चुकीच्या ठिकाणी खर्च होऊ शकतो.
हेही वाचा - महाज्योतीच्या निधीला सरकारकडून कात्री ?, ओबीसी विद्यार्थ्यांचा भोजन, निर्वाह भत्ता अडवल्याची माहिती
अंगणवाडी सेविकांना या कामासाठी विशेष प्रशिक्षण देण्यात आले असून, पडताळणी प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी डिजिटल नोंदणी प्रणालीचा वापर करण्याचाही विचार सुरू आहे. लाभार्थ्यांच्या माहितीत आढळणाऱ्या विसंगती त्वरित वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत. संपूर्ण तपास पूर्ण होईपर्यंत आणि सर्व प्रकरणांची समीक्षा होईपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहील. सरकारच्या मते, या तपासामुळे अपात्र लाभार्थ्यांचे नाव वगळून खरोखरच गरजू आणि पात्र महिलांपर्यंत ‘माझी लाडकी बहीण’ योजनेचा लाभ पोहोचेल.