Wednesday, August 20, 2025 01:28:08 PM

लोकल अपघातात 26 हजार प्रवाशांचा मृत्यू; अन् रेल्वेकडून आर्थिक मदत फक्त 1400 कुटुंबीयांना

मागील 10 वर्षात उपनगरीय लोकल ट्रेनच्या अपघातात तब्बल 26 हजार 547 प्रवाशांचा मृत्यू झाला असून त्यापैकी सर्वाधिक म्हणजे 14 हजार 175 अपघात रुळ ओलांडताना झाले आहेत.

लोकल अपघातात 26 हजार प्रवाशांचा मृत्यू अन् रेल्वेकडून आर्थिक मदत फक्त 1400 कुटुंबीयांना

चंद्रकांत शिंदे. मुंबई: मागील 10 वर्षात उपनगरीय लोकल ट्रेनच्या अपघातात तब्बल 26 हजार 547 प्रवाशांचा मृत्यू झाला असून त्यापैकी सर्वाधिक म्हणजे 14 हजार 175 अपघात रुळ ओलांडताना झाले आहेत. पश्चिम रेल्वेने अपघातांमधील फक्त 1 हजार 408 मृतांच्या नातेवाईकांना 103 कोटी रुपये, तर जखमींना 14 कोटी रुपयांची आर्थिक मदत (नुकसान भरपाई) दिले आहेत.

दररोज 70 लाखांहून अधिक प्रवासी मुंबई लोकलने प्रवास करतात. शहरातील लोकसंख्या सतत वाढत असल्याने त्याचा ताण लोकलवर पडत आहे. प्रचंड गर्दीमुळे लोकलमधून खाली पडणे, रुळ ओलांडताना, फलाटावरील पोकळीत पडून, वीजेचा धक्का लागून, चेंगराचेंगरीमुळे दररोज अपघात होत असतात. दररोज मुंबईतील तिन्ही रेल्वे मार्गावर होणाऱ्या अपघातांत सरासरी 8 जणांचा मृत्यू होतो. 

रेल्वेच्या एका डब्यात प्रत्यक्ष क्षमतेपेक्षा 2-3 पट अधिक प्रवासी सामावलेले असतात. त्यामुळे चढताना किंवा उतरताना धक्काबुक्की होते. परिणामी प्रवासी लोकलमधून खाली पडतात. नाईलाजाने अनेक प्रवासी लोकलच्या उघड्या दरवाजात लटकून प्रवास करतात. जागा नसल्यामुळे प्रवासी दरवाजाच्या पायऱ्यांवर (फुटबोर्ड) उभे राहतात. त्यामुळे विद्युत खांब, किंवा इतर वस्तूंना धडक बसून अपघात होतो. वेळ वाचवण्यासाठी बरेच लोक रूळ ओलांडतात. यामुळे लोकलच्या धडकेने अनेकांचा मृत्यू होतो. या अपघातांची संख्या दरवर्षी वाढतच आहे.

हेही वाचा: Sambhajinagar Crime: प्रेमात धोका, वादातून टोकाचं पाऊल; प्रियकराने प्रेयसीला खोल घाटात ढकललं

मागील 10 वर्षांत लोकलमध्ये किती प्रवाशांचा मृत्यू झाला याबाबत माहिती अधिकार कार्यकर्ते आणि वॉच डॉग संस्थेचे अध्यक्ष गॉडफ्री पिमेंटा यांनी माहिती मागवली होती. रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार जानेवारी 2015 ते मे 2025 या 10 वर्षांच्या कालावधीत एकूण 26 हजार 547 प्रवाशांचा विविध अपघात आणि दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. त्यात सर्वाधिक म्हणजे 14 हजार 175 जणांचा मृत्यू रेल्वे रूळ ओलांडताना झाला आहे. त्यापाठोपाठ लोकलमधून पडणे, रेल्वे खांबाला घडक, वीजेचा धक्का, आत्महत्या आदी कारणांचा समावेश आहे. 

रेल्वे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांच्या वारसांना रेल्वेकडून आर्थिक मदत दिली जाते. रेल्वेने 1 जानेवारी 2015 ते 31 मे 2025 या 10 वर्षांच्या कालावधीत झालेल्या 1 हजार 408 मृतांच्या वारसांना 103 कोटी 71 लाख 75 हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली आहे. तर 494जखमींना 14 कोटी 24 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली आहे. 


सम्बन्धित सामग्री