Monday, September 01, 2025 12:46:07 AM

Slab Collapse In Mira Road: मीरा रोड येथे इमारतीचा स्लॅब कोसळून 4 वर्षीय चिमुरड्याचा मृत्यू, वडील गंभीर जखमी

मीरा रोड येथील नूरजहाँ-1 इमारतीचा स्लॅब कोसळून एका 4 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला तर त्याचे वडील गंभीर जखमी झाले आहेत.

slab collapse in mira road मीरा रोड येथे इमारतीचा स्लॅब कोसळून 4 वर्षीय चिमुरड्याचा  मृत्यू वडील गंभीर जखमी

Slab Collapse In Mira Road: मुंबईतील मीरा रोड आणि नवी मुंबईतील नेरुळ या दोन्ही ठिकाणी इमारतीचा स्लॅब कोसळल्याच्या हृदयद्रावक घटना समोर आल्या आहेत. यामुळे पुन्हा एकदा जुन्या आणि मोडकळीस आलेल्या घरांच्या सुरक्षिततेचा मुद्दा चर्चेत आला आहे. मीरा रोड येथील नूरजहाँ-1 इमारतीचा स्लॅब कोसळून एका 4 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला तर त्याचे वडील गंभीर जखमी झाले आहेत. ही दुर्घटना ज्युडिओ स्टोअरसमोर घडली. जखमी वडिलांना तात्काळ वोक्हार्ट रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

स्थानिक रहिवाशांच्या माहितीनुसार, ही इमारत सुमारे 40 वर्षे जुनी असून गेल्या अनेक वर्षांपासून तिच्या पुनर्विकासाची मागणी होत आहे. परंतु बिल्डरशी असलेले वाद आणि कागदपत्रांच्या अभावामुळे हा प्रकल्प पुढे गेला नाही. प्रशासन आणि बिल्डरांच्या दुर्लक्षामुळे अनेक जुन्या इमारती अजूनही धोक्याचे घर असल्याचे स्थानिक रहिवाशांचे म्हणणे आहे. या अपघातानंतर लोक संतप्त झाले आहेत. तसेच स्थानिकांनी मीरा-भाईंदर महानगरपालिकेने जर वेळेत कठोर पावले उचलली असती तर निष्पापांचा जीव गेला नसता, असे मत व्यक्त केले आहेत. 

हेही वाचा - PMPML Bus Driver Suffers Heart Attack: पुण्यात मोठा अपघात टळला! चालत्या पीएमपीएमएल बसच्या चालकाला हृदयविकाराचा झटका; वाहतूक पोलिसांनी CPR देऊन वाचवले प्राण

नेरुळमध्ये महिला गंभीर जखमी - 

दरम्यान, नवी मुंबईतील नेरुळ सेक्टर-1 मधील विघ्नहर्ता सोसायटीतही अशीच दुर्घटना घडली. इथे एका फ्लॅटच्या छताचा एक भाग अचानक कोसळला आणि एका महिलेला गंभीर दुखापत झाली. जखमी महिलेला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले असून, तिच्यावर उपचार सुरू आहेत.

हेही वाचा - Ganeshotsav 2025 : डोंबिवलीतील माणकोली उड्डाणपूल चार दिवस राहणार बंद; विसर्जनादरम्यान वाहतुकीतही बदल

या घटनेचा व्हिडिओ देखील समोर आला आहे, ज्यामध्ये महिला रक्ताने माखलेली दिसत आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की सततच्या पावसामुळे आधीच जीर्ण झालेल्या इमारतीची स्थिती अधिकच बिकट झाली होती, ज्यामुळे हा अपघात घडला. या दोन घटनांनंतर, मुंबई आणि उपनगरातील शेकडो मोडकळीस आलेल्या इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.


सम्बन्धित सामग्री