संदेश कान्हू. प्रतिनिधी. यवतमाळ: यवतमाळ शहरात एक गंभीर आणि संवेदनशील घटना घडली. एका गर्भवती गायीच्या पोटातून तब्बल 40 किलो प्लास्टिक कचरा यशस्वीरित्या काढण्यात आला. मोठ्या प्रमाणात गायीच्या पोटात साठलेला प्लास्टिक तिच्या आरोग्यासाठी तर धोकादायक होतेच, यासह गर्भातील वासराच्या जीवासाठीही घातक ठरत होते. गुंतागुंतीची ही शस्त्रक्रिया डॉ. गोपाल चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली डॉ. अक्षय चव्हाण, डॉ. पियुष जोपे आणि अंश गटलेवार यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली. सध्या गायीची प्रकृती स्थिर असून ती हळूहळू बरी होत आहे.
हेही वाचा: सांगलीत 185 बोगस पॅथॉलॉजी लॅबचा पर्दाफाश; राजकीय हस्तक्षेपामुळे कारवाईला ब्रेक
या घटनेतून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे की प्लास्टिक प्रदूषण मूक प्राण्यांसाठी किती प्राणघातक ठरत आहे. विशेषतः जेव्हा अन्नपदार्थ प्लास्टिक पिशवीत टाकले जातात, तेव्हा मोकाट जनावरे ते गिळतात आणि त्यांच्या पोटात प्लास्टिक साठून त्यांच्यासाठी जीवघेणी परिस्थिती निर्माण होते. या शस्त्रक्रियेसाठी लागलेला 4500 रुपयांचा खर्च विक्की शर्मा यांनी उचलला. 'अन्नाचा उरलेला कचरा प्लास्टिकमध्ये टाकू नये. तसेच, तो प्राण्यांच्या आवाक्यातील ठिकाणी फेकू नये', असे आवाहन आठवडी बाजार गौ-निवास आणि ‘बी काइंड’ संस्थेतर्फे नागरिकांना करण्यात आले.