मुंबई: महाराष्ट्राचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी बुधवारी विधानसभेत मोठा खुलासा केला आहे. मुंबईत तब्बल 420 अनधिकृत शाळा सुरू असल्याचे उघड झाले आहे. त्यापैकी 47 शाळा आधीच बंद करण्यात आल्या आहेत, तर उर्वरित शाळांवर कारवाई सुरू असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. राज्य सरकारने मुंबईतील शिक्षण व्यवस्थेतील गोंधळावर लक्ष केंद्रीत करत आता कारवाईचा बडगा उचलला आहे.
शिवसेना (यूबीटी) आमदार भास्कर जाधव आणि इतर सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना दादा भुसे यांनी म्हटलं आहे की, 103 शाळांवर दंड ठोठावण्यात आला आहे, तर 126 शाळांवर फौजदारी खटले दाखल करण्यात आले आहेत. राज्य सरकारने अनधिकृत शैक्षणिक संस्थांविरुद्ध सक्रियपणे कारवाई सुरू केली आहे. ही परिस्थिती शिक्षण व्यवस्थेतील नियामक नियमांच्या अंमलबजावणीतील मोठे उल्लंघन अधोरेखित करते.
हेही वाचा - मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली प्रादाविरुद्धची जनहित याचिका
218 शाळा परवाना नूतनीकरणात अपयशी -
दरम्यान, यावेळी दादा भुसे यांनी सांगितले की, मुंबईतील 1057 शाळा (अनुदानित आणि विनाअनुदानित) अधिकृत परवान्यांसह कार्यरत आहेत. मात्र, 2022 मध्ये 218 शाळांनी परवान्याचे नूतनीकरण केले नव्हते. यापैकी 211 शाळांना नंतर RTE कायद्यानुसार मान्यता देण्यात आली, तर 7 शाळा नियमांचे पालन न केल्याने बंद करण्यात आल्या.
हेही वाचा - BMC ला झटका! कबुतरखाना हटवण्यावर कोर्टाची बंदी
SIT मार्फत शिक्षकांच्या फसव्या नियुक्त्यांची चौकशी -
याशिवाय, भाजप आमदार स्नेहा दुबे पंडित यांच्या दुसऱ्या प्रश्नाला उत्तर देताना भुसे यांनी सांगितले की, राज्य सरकार एक विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्याच्या प्रक्रियेत आहे. या SIT मार्फत शालेय शिक्षण विभागाच्या डॅशबोर्डवर बेकायदेशीररित्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नावे समाविष्ट करण्याच्या प्रकरणांची चौकशी केली जाणार आहे. हे पाऊल प्रणालीतील गैरवापर आणि संभाव्य फसव्या नियुक्त्या रोखण्यासाठी उचलण्यात आले आहे. सरकारची ही कारवाई शिक्षण क्षेत्रात पारदर्शकता, जबाबदारी आणि सुधारणांचा मार्ग मोकळा करत असल्याचे भुसे यांनी यावेळी नमूद केलं.