Gadchiroli Accident: गडचिरोली जिल्ह्यातील काटली गावाजवळ गुरुवारी पहाटे एक अत्यंत दुर्दैवी अपघात घडला. मॉर्निंग वॉकला गेलेल्या सहा अल्पवयीन मुलांना एका भरधाव वेगाने येणाऱ्या मालवाहू ट्रकने चिरडले. या दुर्घटनेत चार मुलांचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना पहाटे सुमारे 5.30 वाजण्याच्या सुमारास घडली. काटली गावातील सहा मुले त्यांच्या नियमित मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडली होती. ते रस्त्याने चालत असताना, गडचिरोलीहून आरमोरीकडे जाणाऱ्या एका भरधाव ट्रकने त्यांना धडक दिली. या अपघातानंतर चालक घटनास्थळावरून पळून गेला.
अपघातात दोन मुलांचा जागीच मृत्यू झाला, तर उर्वरित चार जणांना गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात आले. त्यापैकी दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. उर्वरित दोघे गंभीर जखमी असून त्यांना पुढील उपचारासाठी नागपूरला हलवण्यात आले आहे. दरम्यान, मृतांची ओळख पटली आहे. या अपघातात पिंकू नामदेव भोयर (वय,14, तन्मय बालाजी मानकर (वय,16), दिशांत दुर्यधन मेश्राम (15), तुषार राजेंद्र मारबते (14) यांचा मृत्यू झाला आहे. तथापी, क्षितिज तुलनीदास मेश्राम (13) आणि आदित्य धनंजय कोहापटे (14) हे या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत.
हेही वाचा - Accident in Udhampur: उधमपूरमध्ये CRPF जवानांचे वाहन 200 फूट खोल दरीत कोसळले; 3 जणांचा मृत्यू, 10 जखमी
या दुर्दैवी अपघातानंतर संपूर्ण गावावर शोककळा पसरली असून गावकऱ्यांचा संताप उफाळून आला आहे. कटली, साखरा आणि पोर्ला येथील ग्रामस्थांनी महामार्ग रोखून धरत कडक निषेध नोंदवला. त्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. अपघाताची माहिती मिळताचं गडचिरोलीचे पोलिस निरीक्षक विनोद चव्हाण यांनी घटनास्थळी धाव घेतली. गावात आणि रुग्णालयात कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. संबंधित ट्रक व चालकाचा शोध घेण्यासाठी तपास सुरू असून सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
हेही वाचा - Uttarkashi Cloudburst Update: महाराष्ट्राचे 34 पर्यटक उत्तराखंडमध्ये बेपत्ता?
राज्य सरकारची त्वरित मदत -
राज्य सरकारने तातडीने मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 4 लाखांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. तसेच जखमी मुलांना नागपूरला हेलिकॉप्टरने हलवण्याची व्यवस्था करण्यात आली असून सर्व वैद्यकीय खर्च शासन उचलणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया -
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्दैवी घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले. त्यांनी X वरील पोस्टमध्ये लिहिले की, 'मी शोकाकुल कुटुंबांप्रती माझ्या मनःपूर्वक संवेदना व्यक्त करतो. दुःख आणि नुकसानाच्या या कठीण क्षणी आम्ही त्यांच्यासोबत आहोत. मृतांच्या कुटुंबांना 4 लाखांची मदत दिली जाईल आणि जखमींच्या उपचाराचा सर्व खर्च सरकार करेल.'