मुंबई: वांद्रे येथील 62 वर्षीय महिलेला शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष दाखवून तब्बल 7.88 कोटींना गंडा घालण्यात आला आहे. ही घटना जून ते जुलै 2025 दरम्यान घडली असून सायबर गुन्हेगारांनी ‘आनंद राठी’ या नामांकित फायनान्स कंपनीचे बनावट प्रतिनिधी असल्याचे भासवले. महिलेने मुंबई सायबर पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीनुसार, तिला जून महिन्यात अज्ञात व्हॉट्सअॅप नंबरवरून ‘प्रिया शर्मा’ या नावाने मेसेज आला. तिने स्वतःला ‘आनंद राठी’ कंपनीत काम करणाऱ्या सुरेश मल्होत्राची सहाय्यक असल्याचे सांगितले. नंतर पीडित महिलेला बनावट वेबसाइट आणि व्हॉट्सअॅप गुंतवणूक ग्रुपमध्ये सामील करण्यात आले.
या ग्रुपमध्ये 71 सदस्य, शेअर टिप्स आणि ट्रेडिंग माहिती नियमित शेअर केली जात होती. लवकरच, सुमन गुप्ता नावाच्या दुसऱ्या व्यक्तीने तिच्याशी संपर्क साधून बनावट ट्रेडिंग अॅप ‘AR’ डाउनलोड करण्यास सांगितले. अॅपमध्ये विश्वास निर्माण करून विविध बँक खात्यांमध्ये तिच्याकडून टप्प्याटप्प्याने 7.88 कोटी रुपये ट्रान्सफर करून घेण्यात आले.
हेही वाचा - किडनी विकण्याच्या नावाखाली सायबर गुन्हेगारांकडून दहिसरमधील तरुणाची 3 लाखांची फसवणूक
दरम्यान, अॅपवर दिसणाऱ्या बनावट यशस्वी व्यवहारांमुळे पीडित महिला गुंतवणूक वाढवत राहिली. मात्र, 11 जुलै रोजी पैसे काढण्याचा प्रयत्न करताना तिला अजून 10% रक्कम भरण्याचा सल्ला दिला गेला. यानंतर महिलेला संशय आला. त्यानंतर पीडितेला आपली फसवणूक झाल्याचे समजले.
हेही वाचा - संभाजीनगरमध्ये एटीएम कार्ड बदलून लूट करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; पोलिसांकडून पाच जणांना अटक
या सर्व प्रकारानंतर महिलेने सायबर पोर्टलवर तक्रार नोंदवून प्रिया शर्मा, सुमन गुप्ता आणि बनावट अॅपच्या माध्यमातून आपली फसवणूक झाल्याचे सांगितले. सध्या मुंबई सायबर पोलिस विभाग या प्रकरणाचा सखोल तपास करत असून गुन्हेगारांचा माग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.