भोकरदन: जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. सरकारी अनुदानित आदिवासी निवासी शाळेच्या वसतिगृहात आठ वर्षांच्या विद्यार्थ्याचा मृतदेह आढळून आला. मुलाच्या हत्येप्रकरणी 8 आणि 14 वर्षांच्या दोन अल्पवयीन विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात घेत आहे. प्राथमिक तपासानुसार, सोमवारी संध्याकाळी मुलांमध्ये खेळताना वाद झाला होता. मंगळवारी पहाटे 1 वाजताच्या सुमारास दोघांनी मिळून पीडित मुलाचा गळ्या दोरीने दाबून हत्या केल्याचा संशय आहे. सकाळी वॉर्डनने सर्वांना उठवले, त्यावेळी या मुलाचा मृतदेह अंथरुणावर आढळून आला. रुग्णालयात नेताच त्याला मृत घोषित करण्यात आले.
पोस्टमॉर्टेम अहवाल प्रतीक्षेत असला तरी गळ्याभोवती आढळलेल्या खुणांवरून मृत्यूचे कारण श्वास रोखल्यामुळे झाले असावे, असा प्राथमिक अंदाज आहे. पीडित दुसरी इयत्तेत शिकत होता. तसेच तो दोन महिन्यांपूर्वीच वसतिगृहात दाखल झाला होता.
हेही वाचा - Nagpur: वसतिगृहात घुसून मुलीचा विनयभंग; 64 मुलींमध्ये भीतीचे वातावरण
गुन्हा दाखल -
या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केल्याचे सांगितले. मुलाची हत्या करणाऱ्या दोघांना बाल कल्याण समितीसमोर हजर करून सुधारगृहात पाठवण्यात आले आहे.
हेही वाचा - Sambhajinagar Crime: 'मी वर गेल्यावरच न्यायला या', आईला तो शेवटचा कॉल अन् जयाने संपवलं जीवन
दरम्यान, शिक्षण विभाग, बाल संरक्षण संस्था आणि स्थानिक प्रशासन यांच्यातर्फे घटनास्थळी भेट देऊन उच्चस्तरीय चौकशी सुरू करण्यात आली आहे. शाळेत विद्यार्थ्यांसाठी मानसिक समुपदेशन सुरू करण्यात आले आहे. ही घटना केवळ एका कुटुंबाचे नव्हे, तर संपूर्ण शिक्षण व्यवस्थेचे आणि सुरक्षिततेचे दु:खद वास्तव अधोरेखित करते. मृत मुलाच्या पालकांनी प्रशासनाकडे याप्रकरणी कठोर कारवाईची मागणी केली आहे.