Wednesday, August 20, 2025 08:45:40 PM

आंबेगाव तालुक्यातील 27 वर्षीय जवानाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

सीमा रस्ते संघटनेत (BRO) ड्रॉइंग एस्टॅब्लिशमेंट सुपरवायझर (DES) म्हणून कार्यरत असलेले 27 वर्षीय सुभाष अनिल दाते यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.

आंबेगाव तालुक्यातील 27 वर्षीय जवानाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
प्रतिकात्मक प्रतिमा
Edited Image

आंबेगाव: जम्मू आणि काश्मीरमधील सीमा रस्ते संघटनेत (BRO) ड्रॉइंग एस्टॅब्लिशमेंट सुपरवायझर (DES) म्हणून कार्यरत असलेले 27 वर्षीय सुभाष अनिल दाते यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते पाच दिवसांच्या रजेवर आपल्या गावात परतले असताना ही दुःखद घटना घडली. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. सुभाष दाते हे आंबेगाव तालुक्यातील पश्चिम आदिवासी भागातील राजपूर येथील अतिशय गरिब कुटुंबातील होते. त्यांच्या बालपणापासूनच त्यांची परिस्थिती कठीण होती. 

आई सुमन अनिल दाते आणि मामा चंदू साधू लोहकरे यांच्या सोबत त्यांचे संगोपन झाले. प्राथमिक शिक्षण राजपूरमध्ये तर माध्यमिक शिक्षण शिवोनली येथे पूर्ण केल्यानंतर त्यांनी माणिकडोह येथून आयटीआय पूर्ण केले. देशसेवेच्या प्रेरणेतून त्यांनी भारतीय लष्करात भरती होण्याचा निर्णय घेतला. अखेर कठोर प्रयत्नांनंतर त्यांची BRO मध्ये DES पदावर नियुक्त झाली.

हेही वाचा - MPSC च्या निकालामुळे नैराश्य! लातूरमध्ये विक्रीकर निरीक्षकाने लॉजमध्ये गळफास घेत संपवलं जीवन

सुभाष गेल्या दोन वर्षांपासून जम्मू आणि काश्मीरमध्ये कार्यरत होते. काही दिवसांची रजा घेऊन ते राजपूर येथे परतले होते. स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी त्यांनी पाच दिवसांची रजा घेतली होती. परंतु 30 जुलै रोजी छातीत तीव्र वेदना झाल्याने त्यांना तातडीने तळेघर ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले, नंतर घोडेगाव येथे रेफर करण्यात आले. मात्र, उपचार सुरू होण्याआधीच त्यांचे निधन झाले. सुभाष यांचे पार्थिव मंचर येथे शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले होते. त्यानंतर राजपूर येथे त्यांच्यावर पूर्ण राजकीय सन्मानाने अंत्यसंस्कार करण्यात आले. हजारो ग्रामस्थ, आदिवासी बांधव, नातेवाईक आणि प्रशासकीय अधिकारी या अंत्यसंस्कारासाठी उपस्थित होते.

हेही वाचा - Nanded Crime News : नांदेड हादरलं; तरूणाने मुलीला भरदिवसा दुचाकीवर जबरदस्तीने उचलून नेले अन्...

सुभाष दाते यांच्या अकाली निधनामुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. त्यांचा शांत, नम्र आणि मदतीला तत्पर स्वभाव सर्वांनाच आपलस करत असे. परंतु, आता त्यांच्या जाण्याने केवळ त्यांच्या कुटुंबावर नव्हे, तर संपूर्ण परिसरातील नागरिकांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. 
 


सम्बन्धित सामग्री