नागपूर : नागपूरच्या गनेशपेठ परिसरातील द्वारकामाई हॉटेलमध्ये बॉम्ब असल्याचा ईमेल मिळाल्याने परिसरात ऐकताच खळबळ उडाली. सोमवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास हॉटेल मॅनेजरला एक मेल आला, ज्यामध्ये हॉटेलमध्ये बॉम्ब ठेवल्याचे सांगण्यात आले होते. या मेलमध्ये सकाळी 9:30 वाजता बॉम्ब स्फोट होईल, असे म्हटले होते.

घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दल, पोलीस, आणि बॉम्बशोधक व नाशक पथक घटनास्थळी दाखल झाले. हॉटेलमधील स्टाफ आणि पाहुण्यांना तातडीने सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. संपूर्ण हॉटेलची कसून तपासणी सुरू असून वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, “हॉटेलला मिळालेल्या मेलच्या आधारावर आम्ही तपास सुरू केला आहे. प्राथमिक तपासणीत अद्याप काहीही संशयास्पद आढळलेले नाही. मात्र, फेक मेल समजून दुर्लक्ष न करता आम्ही प्रोटोकॉलनुसार सर्व उपाययोजना करत आहोत.”

तपास अधिकाऱ्यांनी मेलच्या स्त्रोताचा शोध घेण्यासाठी सायबर विभागाची मदत घेतली आहे. मेल फेक आहे की खरी धमकी, याबाबत शंका दूर करण्यासाठी कसून चौकशी सुरू आहे.या घटनेमुळे गनेशपेठ परिसरात काही काळ तणावाचे वातावरण होते. मात्र, पोलिसांच्या जलद कारवाईमुळे परिस्थिती नियंत्रणात आहे. नागपूर पोलीस नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन करत असून, तपासानंतर संपूर्ण माहिती दिली जाईल, असे आश्वासन दिले आहे.