Monday, September 01, 2025 04:11:46 AM

धक्कादायक! दिघी येथे ATM मधून पैसे काढताना विजेचा धक्का लागून 30 वर्षीय तरुणाचा मृत्यू

प्राप्त माहितीनुसार, 6:45 ते 7:00 वाजेच्या दरम्यान भावेश एटीएमचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करत असताना स्टीलच्या हँडलला हात लावल्यानंतर त्याला जोरदार विजेचा धक्का बसला. त्यानंतर तो ताबडतोब जागीच कोसळला.

धक्कादायक दिघी येथे atm मधून पैसे काढताना विजेचा धक्का लागून 30 वर्षीय तरुणाचा मृत्यू
Edited Image

रायगड: रायगड जिल्ह्यातील दिघी येथे रक्षाबंधन सणाच्या सायंकाळी एका 30 वर्षीय तरुणाचा विजेचा धक्का बसून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. भावेश नरेंद्र पोवळे असं या तरुणाचं नाव आहे. भावेश श्रीवर्धन तालुक्यातील कुडगावचा रहिवासी होता. तो दिघी येथील बँक ऑफ महाराष्ट्रच्या एटीएमवर पैसे काढण्यासाठी गेला होता. प्राप्त माहितीनुसार, 6:45 ते 7:00 वाजेच्या दरम्यान भावेश एटीएमचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करत असताना स्टीलच्या हँडलला हात लावल्यानंतर त्याला जोरदार विजेचा धक्का बसला. त्यानंतर तो ताबडतोब जागीच कोसळला. 

स्थानिकांनी त्याला लगेच बोर्लीपंचतन येथील डॉ. साळुंखे यांच्या माऊली रुग्णालयात नेले, पण उपचार सुरू होण्याआधीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या दुर्दैवी घटनेमुळे दिघी गावात आणि परिसरात शोककळा पसरली आहे. गावकऱ्यांनी स्थानिक प्रशासनावर आणि एटीएम व्यवस्थापनावर निष्काळजीपणाचा आरोप करत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. तसेच, विजेच्या अपघातामुळे मृत्यू झालेल्या भावेश यांच्या कुटुंबाला आर्थिक भरपाई देण्याचीही मागणीही गावकऱ्यांकडून करण्यात येत आहे. 

हेही वाचा - लाडकी बहिन योजनेबाबत मोठी बातमी! 26 लाख संशयित अपात्र लाभार्थ्यांची चौकशी होणार

याप्रकरणी कुडगावच्या रहिवासी अनिता अनंत पिंपळे यांनी दिघी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी बीएनएसएस 194 नुसार अपघाती मृत्यूचा गुन्हा नोंदवला असून, प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक हनुमंत शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिस उपनिरीक्षक शेख या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. 

हेही वाचा - नागपूर-पुणे वंदे भारत ट्रेनचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन

या घटनेने परिसरातील लोकांमध्ये वीज सुरक्षा आणि सरकारी सुविधांबाबत प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. तसेच प्रशासनाने एटीएम आणि इतर सार्वजनिक ठिकाणी सुरक्षितता उपाययोजना करण्यासाठी तातडीने पावले उचलण्याची गरज असल्याचे मत स्थानिकांनी व्यक्त केले आहे.
 


सम्बन्धित सामग्री