Wednesday, August 20, 2025 09:22:49 AM

Ahilyanagar: आजोबांनी बिबट्याच्या तावडीतून मोठ्या धाडसाने वाचवला नातवाचा जीव

कोपरगाव तालुक्यातील येसगाव शिवारात आज एका हृदयद्रावक घटनेत एका आजोबांनी  कोणताही विचार न करता बिबट्यावर झेप घेऊन मोठ्या शौर्याने आपल्या चार वर्षांच्या नातवाचे प्राण बिबट्याच्या तावडीतून वाचवले आहेत.

ahilyanagar आजोबांनी बिबट्याच्या तावडीतून मोठ्या धाडसाने वाचवला नातवाचा जीव

अहिल्यानगर: कोपरगाव तालुक्यातील येसगाव शिवारात आज एका हृदयद्रावक घटनेत एका आजोबांनी  कोणताही विचार न करता बिबट्यावर झेप घेऊन मोठ्या शौर्याने आपल्या चार वर्षांच्या नातवाचे प्राण बिबट्याच्या तावडीतून वाचवले आहेत. 

अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील येसगाव शिवारातील कोल्हे वस्तीजवळ कुणाल अजय आहेर हा चिमुकला आपल्या आईच्या मागे घराबाहेर खेळत असताना उसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्याच्यावर हल्ला केला. बिबट्याने कुणालला मानेवर चावा घेत ऊसात ओढून नेले. नातवाची किंकाळी ऐकताच आजोबा मच्छिंद्र आहेर यांनी कोणताही विचार न करता बिबट्यावर झेप घेतली आणि मोठ्या धैर्याने आपल्या नातवाला त्याच्या तावडीतून सोडवले. 

हेही वाचा: Love Horoscope: 'या' राशींना त्यांच्या जोडीदाराकडून आनंदाची बातमी मिळेल

या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. जखमी कुणालला तातडीने कोपरगाव शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच वन विभागाने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करत परिसरात पिंजरा लावला असून बिबट्याचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. 

सध्या कोपरगाव तालुक्यात अनेक ठिकाणी बिबट्यांचा वावर असून वन विभागाने याची दखल घेऊन तात्काळ पिंजरे लावण्याची आवश्यकता आहे. मात्र वन विभागाकडे सध्या पिंजऱ्यांची संख्या कमी असल्याचे निदर्शनास येत असून शासनाने पिंजऱ्यांची संख्या वाढवून द्यावी अशीच मागणी आता समोर येत आहे.

बिबट्याने केलेल्या हल्ल्यावेळी आजोबांनी दाखविलेल्या धाडसामुळे चिमुकल्या कुणालचे प्राण वाचले असून, त्यांच्या शौर्याची सर्वत्र प्रशंसा होत आहे.


सम्बन्धित सामग्री