पुणे: 2024 च्या लोकसभा निवडणुकीत झालेल्या मतचोरीचा मुद्दा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी उपस्थित केला. हा मुद्दा मांडल्याने माझ्या जीवाला धोका निर्माण झाला असल्याची लेखी माहिती राहुल गांधी यांनी बुधवारी पुण्यातील विशेष न्यायालयात दिली. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत केलेल्या कथित बदनामी केल्याच्या आरोपावरुन त्यांच्याविरोधात दाखल असलेल्या खटल्याची सुनावणी होत असताना, राहुल गांधी यांचे वकील मिलिंद पवार यांनी ही माहिती न्यायालयात सादर केली.
राहुल गांधी यांचे वकील मिलिंद पवार यांनी सादर केलेल्या निवेदनानुसार, भाजप नेते तरविंदर मारवा यांनी राहुल गांधी यांना धमकी दिली आहे. धमकी देत त्यांनी म्हटले होते की, “ते नीट वागले नाहीत, तर त्यांच्या आजी इंदिरा गांधी यांच्यासारखे होईल.” तसेच भाजपाच्या आणखी एका नेत्याने त्यांना ‘दहशतवादी’ असे संबोधले आहे. सध्याचे राजकीय वातावरण आणि या खटल्यातील याचिकाकर्ता सत्यकी यांचे गोडसे घराण्याशी असलेले संबंध लक्षात घेता, राहुल गांधी यांच्या सुरक्षेला गंभीर धोका असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
Amul Brand: अमूल ब्रँड अमेरिकेत गाजतोय, ट्रम्पनं टेरिफ लावूनही भारतीय उत्पादन वरचढ
न्यायालयात दिलेल्या माहितीत नमूद करण्यात आले की, भारतीय न्यायव्यवस्थेच्या स्वातंत्र्याबद्दल राहुल गांधी यांना पूर्ण आदर आहे. मात्र खटला पुढे जात असताना वाढणारा दबाव आणि बाहेरील असामान्य परिस्थिती न्यायालयाने लक्षात घ्यावी. हा खटला दाखल करणारे लोक धार्मिक वातावरण दूषित करणे, समाजात तेढ निर्माण करणे, निवडणुकीत गैरप्रकार करणे आणि ठराविक उद्योजकांचे हित साधणे यासाठी परिचित असल्याचा उल्लेखही निवेदनात केला आहे.
हिंदुत्वाचे समर्थन करणाऱ्या जहालवादी गटांकडून जीवाला धोका असल्याचे राहुल गांधीच्या वतीने त्यांच्या वकिलांनी विशेष न्यायालयात म्हटले आहे. वकिलांनी दिलेल्या माहितीनंतर आता न्यायालय काय निर्देश देते? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राहुल गांधी सातत्याने भाजपावर टीका करताना पाहायला मिळत आहेत. महाराष्ट्रात सहा महिन्यांपूर्वी विधानसभा निवडणूक पार पडली. विधानसभा निवडणुकीच्या निकालावरुन राहुल गांधी वारंवार टीकास्त्र डागत आहेत. तसेच विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला होता. यानंतर राहुल गांधींनी बनावट मतदारांचा मुद्दा उपस्थित केला. महाराष्ट्रात सायंकाळी 5 नंतर अचानक मतदानाची आकडेवारी वाढली असे म्हणत राहुल गांधी सातत्याने शंका व्यक्त करताना दिसत आहेत.