मुंबई: मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आणि महाराष्ट्र सरकारच्या सूचनांनुसार, बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) शहरातील कबुतरखान्यांवर मोठी कारवाई सुरू केली आहे. दादर येथील प्रसिद्ध कबुतरखान्याला सील करून अधिकृतपणे कबुतरांना खाद्य देण्यावर बंदी घालण्यात आली आहे. सहाय्यक आयुक्त जयदीप मोरे यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले, 'आम्ही न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करत आहोत. ही कारवाई वैयक्तिक नसून सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक आहे.'
श्वसन आजारांच्या वाढत्या धोक्यामुळे निर्णय -
दरम्यान, कबुतरांच्या विष्ठेमुळे होणाऱ्या गंभीर श्वसन विकारांमुळे ही कारवाई करण्यात आल्याचे BMCचे म्हणणे आहे. हिस्टोप्लाझ्मोसिस, अॅलर्जिक अल्व्होलायटिस आणि सायटाकोसिस या आजारांचा धोका अधोरेखित करत वैद्यकीय क्षेत्रानेही या निर्णयाचे समर्थन केले आहे.
हेही वाचा - 'उच्च न्यायालय रजेवर आहे का?' राज ठाकरेंविरुद्धच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
100 हून अधिक लोकांना दंड -
कबुतरांना खाद्य टाकणाऱ्या 100 हून अधिक व्यक्तींवर प्रत्येकी 500 दंड ठोठावण्यात आला. त्याचप्रमाणे, 25 पोत्यांहून अधिक खाद्य जप्त करण्यात आले आहे. जवळपास 2 हजार कबुतरांना सुरक्षितपणे आश्रयस्थळी हलवण्यात आले आहे.
हेही वाचा - Navi Mumbai : उंदराने खाल्लेले आईसक्रीम ग्राहकांना; सीवूड्स मॉलमध्ये अजब प्रकार
जैन समुदायाचा विरोध -
कबुतरांना खाऊ घालणे हा धार्मिक विधी मानणाऱ्या जैन समुदायाने कुलाबा ते गेटवे ऑफ इंडिया दरम्यान 'कबुतरांना वाचवा' असा नारा देत शांततेत मोर्चा काढला. त्यांनी अध्यात्मिक परंपरेवर प्रतिबंध लावल्याच्या विरोधात निषेध केला.