Wednesday, August 20, 2025 10:29:05 PM

मुंबईसह महाराष्ट्रात चिकनगुनियाचे रुग्ण वाढले; चीनमध्येही परिस्थिती गंभीर, WHO ने व्यक्त केली चिंता

मुंबईमध्ये जानेवारी ते जुलै 2025 दरम्यान चिकनगुनियाचे 265 रुग्ण नोंदवले गेले आहेत, जे 2024 मध्ये याच कालावधीत नोंदवलेल्या फक्त 46 रुग्णांपेक्षा 200% अधिक आहेत.

मुंबईसह महाराष्ट्रात चिकनगुनियाचे रुग्ण वाढले चीनमध्येही परिस्थिती गंभीर who ने व्यक्त केली चिंता

Chikungunya Cases in Maharashtra: मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात चिकनगुनियाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. ही परिस्थिती केवळ राज्यातील आरोग्य यंत्रणांसाठी नव्हे, तर जागतिक आरोग्य संघटनेसाठी (WHO) देखील चिंतेचा विषय बनली आहे. मुंबईमध्ये जानेवारी ते जुलै 2025 दरम्यान चिकनगुनियाचे 265 रुग्ण नोंदवले गेले आहेत, जे 2024 मध्ये याच कालावधीत नोंदवलेल्या फक्त 46 रुग्णांपेक्षा 200% अधिक आहेत. राज्यभरात ही साथ गंभीर होत आहे. 2024 मध्ये राज्यात चिकनगुनियाचे 1,189 रुग्ण होते, तर 2025 मध्ये ही संख्या 1,512 वर गेली आहे. WHO ने दक्षिण आशिया आणि इतर प्रभावित भागांतील परिस्थितीवर गंभीर चिंता व्यक्त केली आहे.

BMC च्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शाह यांनी सांगितले की, मे 2025 मध्ये झालेल्या असमय पावसामुळे मच्छरांच्या प्रजननाला अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे चिकनगुनिया, डेंग्यूसारख्या आजारांमध्ये वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर BMC ने 'शून्य मच्छर प्रजनन अभियान' सुरू केलं आहे. या मोहिमेत साचलेले पाणी हटवणे, कीटकनाशकांची फवारणी, ड्रोनच्या साहाय्याने मच्छर प्रजननस्थळांवर लक्ष ठेवणे या गोष्टींचा समावेश आहे. नागरिकांना पूर्ण बाह्यांचे कपडे घालण्याचा, मच्छर प्रतिबंधक क्रीम वापरण्याचा आणि झोपताना मच्छरदाणी वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच, घरात किंवा परिसरात पाणी साचू दिल्यास दंड आकारण्याचेही निर्देश दिले गेले आहेत.

हेही वाचा - 'राहुल गांधींच्या मेंदूची चिप चोरी झालीय'; देवेंद्र फडणवीस यांचा राहुल गांधींवर निशाणा

चीनमध्येही चिकनगुनियाचा उद्रेक - 

दरम्यान, चीनच्या ग्वांगडोंग प्रांतातील फोशान शहरात जून 2025 पासून सुमारे 7,000 चिकनगुनिया रुग्ण आढळले आहेत. हा चिकनगुनियाचा 2008 नंतरचा सर्वात मोठा प्रकोप मानला जात आहे. उष्ण व आर्द्र हवामानामुळे चिकनगुनियाच्या रुग्णांमध्ये वेगाने वाढ होत आहे. चिनी अधिकाऱ्यांनीही साचलेले पाणी काढणे, कीटकनाशक फवारणी आणि मच्छरदाणी वापर यांसारख्या उपाययोजना तातडीने सुरू केल्या आहेत.

हेही वाचा - Air India lane : पक्षाची विमानाच्या इंजिनला धडक; 140 प्रवाशांनी भरलेल्या विमानाचं उड्डाण रद्द, पायलटनं घेतला हा निर्णय आणि...

चिकनगुनिया म्हणजे काय?

चिकनगुनिया हा एक व्हायरल आजार आहे, जो एडीज एजिप्टी आणि एडीज एल्बोपिक्टस मच्छरांच्या चाव्याने पसरतो. हेच मच्छर डेंग्यू आणि झीका व्हायरसही पसरवतात. या आजारीची लक्षणे अचानक उच्च ताप, तीव्र सांधेदुखी, स्नायू दुखणे, डोकेदुखी, मळमळ, थकवा आणि पुरळ येणे ही आहेत. ही लक्षणे डेंग्यू आणि मलेरियासारखीच आहेत. 

या आजाराचा मृत्युदर 1% पेक्षा कमी असली तरी, लहान मुले, वृद्ध आणि कमकुवत प्रतिकारशक्ती असलेल्या लोकांसाठी तो घातक ठरू शकतो. काही गंभीर प्रकरणांमध्ये या आजारामुळे यकृतदोष, न्यूरोलॉजिकल समस्या देखील होऊ शकतात. चिकनगुनियावर नियंत्रण मिळवण्यासाठी BMC अधिकारी युद्धपातळीवर काम करत आहेत. नागरिकांनी खबरदारी घेणे आणि स्वच्छता राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे. 


सम्बन्धित सामग्री