मुंबई: गोपाळकालाच्या निमित्ताने शनिवारी मुंबई आणि ठाण्यातील सर्व गोविंदा पथकांमध्ये उंच दहीहंडी फोडण्याची स्पर्धा होण्याची शक्यता आहे. अनेकदा रचलेला थर कोसळल्यामुळे अनेक गोविंदा जखमी होतात. त्यामुळे, जखमी गोविंदाना तातडीने वैद्यकीय मदत मिळावी यासाठी मुंबईतील सरकारी रुग्णालये सज्ज झाली आहेत. गोपाळकालाच्या पार्श्वभूमीवर जखमी गोविंदांच्या उपचारासाठी सर्व रुग्णालयांनी खाटा राखीव ठेवल्या आहेत आणि आवश्यक औषधे उपलब्ध करण्यात आली आहेत.
जे.जे. रुग्णालयामध्ये गोविंदांसाठी स्वतंत्र रुग्णकक्ष सज्ज
जखमी गोविंदांच्या उपचारासाठी जे.जे. रुग्णालयातील रुग्णकक्ष तयार करण्यात आला आहे. यात 30 खाटा राखीव ठेवण्यात आले आहेत. यासह, शस्त्रक्रिया विभाग आणि अस्थिव्यंग विभागातही काही खाटा राखीव ठेवण्यात आले आहेत. तसेच, अपघात विभागात सर्व सुविधा आणि औषधे उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
जी.टी. रुग्णालयातही जखमी गोविंदांसाठी 6 खाटा राखीव
गिरगाव, क्रॉफर्ड मार्केट, कुलाबासारख्या गजबजलेल्या परिसरात जखमी गोविंदांना उपचारासाठी जी.टी. रुग्णालयात आणले जाते. दरवर्षी मोठ्या प्रमाणात जखमी गोविंदा येत असल्याने त्यांच्या उपचारासाठी विशेष कक्ष स्थापन करण्यात आला आहे. अस्थिव्यंग विभाग आणि शस्त्रक्रिया विभागातील डॉक्टरांना सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यासह, जखमी गोविंदांसाठी सहा खाटा राखीव ठेवण्यात आले आहेत. तसेच, सेंट जॉर्ज रुग्णालयात येणाऱ्या जखमी गोविंदांना तातडीने उपचार मिळावे, यासाठी अस्थिव्यंग तज्ज्ञ डॉक्टर सज्ज ठेवण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे पाच खाटा राखीव ठेवण्यात आले आहेत.
मुंबई आणि ठाण्यातील बहुतांश जखमी गोविंदांना केईएम रुग्णालयात आणले जाते. त्यामुळे या जखमी गोविंदांना वेळेवर उपचार मिळावेत, यासाठी अलिकडेच सर्व सुविधांचा आढावा घेण्यात आला आहे. तसेच, जखमी गोविंदांसाठी रुग्णालयात 15 खाटा राखीव ठेवण्यात आले आहेत. यात, अतिदक्षता विभागातील खाटांचा समावेश आहे. यासह, अस्थिव्यंग विभागात 4 खाटा राखीव ठेवण्यात आले असून, जीवनरक्षक प्रणालीही सज्ज ठेवण्यात आली आहे.
जखमी गोविंदांना पहिल्या एका तासात उपचार मिळावेत यासाठी नवी मुंबईतील न्यूईरा हॉस्पिटलने मदत क्रमांक 9172970111 जारी केला आहे. या क्रमांकावर उपचार करण्यासाठी तात्काळ वैद्यकीय मदत मिळणार आहे. रुग्णालयात जागा नसल्यामुळे कोणताही रुग्ण उपचारापासून वंचित राहू नये आणि पीडितांना त्वरित उपचार मिळावेत यासाठी विशेष काळजी घेण्यात आली आहे.