मुंबई : पुणे येथील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात तातडीने उपचार न मिळाल्याने श्रीमती तनिषा भिसे या भगिनीला आपला प्राण गमवावा लागल्याची घटना अत्यंत दुर्दैवी असून शासनाने याची गंभीर दखल घेतली आहे. तज्ज्ञ डॉक्टरांच्या समितीद्वारे या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत.
या दुर्दैवी घटनेची गांभीर्याने दखल घेत उपमुख्यमंत्री पवार यांनी पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडून याबाबतची संपूर्ण माहिती घेतली आहे. आरोग्य विभागाने तातडीने, पारदर्शक आणि निष्पक्षपणे चौकशी पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. रुग्णालय प्रशासनाने माध्यमांसमोर त्यांचे म्हणणे मांडले असले, तरी शासन या प्रकरणाचा सर्व संबंधित घटकांची सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करेल. या घटनेबाबत आंदोलन करणाऱ्या व्यक्ती, संस्था आणि संघटनांच्या भावना शासनाने समजून घेतल्या आहेत. चौकशीच्या निष्कर्षानुसार दोषींवर कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल. तसेच अशा घटना भविष्यात घडू नयेत, यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या स्पष्ट सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. सर्व नागरिकांनी संयम बाळगावा आणि प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री पवार यांनी केले आहे.
हेही वाचा : आरोग्य मंत्री प्रकाश अबिटकरांच्या आरोग्य उपसंचालकांना सूचना; गर्भवती महिला मृत्यूप्रकरणी काय म्हणाले?
भाजपा आमदार अमित गोरखे यांनी हा मुद्दा उचलून धरला. अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक सुशांत भिसे यांच्या पत्नी तनिषा भिसे गर्भवती असल्याने तिला तातडीने सुरुवातीला दीनानाथ मंगेशकर या धर्मदाय हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. मात्र हॉस्पिटलने उपचार करण्यापूर्वी तिच्या कुटुंबियांकडे दहा लाख रुपये जमा करण्याची मागणी केली. कुटुंबाने फक्त तीनच लाख रुपये आता आम्ही जमा करू शकतो असे सांगितले. त्यानंतर दीनानाथ हॉस्पिटल प्रशासनाने गर्भवतीला उपचार नाकारून दुसऱ्या हॉस्पिटलला पाठवले होते. त्यात तिला उपचार मिळण्यात दिरंगाई झाल्याने तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. मात्र तिचा मृत्यू होण्यापूर्वी तिने दोन जुळ्या बाळांना जन्म दिला. त्या जुळ्या बाळांची आई दीनानाथ हॉस्पिटलच्या आर्थिक लुबाडणुकीमुळे दगावली आहे असा आरोप आमदार अमित गोरखे यांनी केला. तनिषा भिसे या महिलेच्या मृत्यूने प्रकरण चघळले आहे.